नवी मुंबई : बेलापूर ते पेंधर दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात मेट्रो सेवा देण्यासाठी ‘सिडको’ने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन अर्थात महामेट्रोची निवड केली आहे. त्यानुसार सिडकोने या संदर्भातील स्वीकारपत्र महामेट्रोला दिले आहे. लवकरच याबाबतचा व्यावसायिक करार केला जाणार आहे. कराराच्या तारखेपासून पुढील दहा वर्षे पहिल्या टप्प्यातील मेट्रोची देखभाल आणि परिचालन महामेट्रोमार्फत केले जाणार आहे.
मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या मार्गावर उभारण्यात येणाऱ्या ११ स्थानकांपैकी ६ स्थानकांची कामे अपूर्ण आहेत. ती पूर्ण करण्याची जबाबदारी यापूर्वीच महामेट्रोवर सोपविण्यात आली आहे. आता मेट्रोची देखभाल आणि परिचालनाची जबाबदारीही महामेट्रोवर सोपविण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यासाठी सिडको महामेट्रोला ८८५ कोटी रुपये अदा करणार आहे. हा करार १० वर्षांचा असेल, असे महामेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नवी मुंबई मेट्रोचे परिचालन आणि देखभाल सेवा पुरविण्यासाठी महामेट्रोला स्वीकारपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे कामे वेगाने पूर्ण होऊन, लवकरच या मार्गावर प्रवासी सेवा सुरू करणे शक्य होईल, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे.
२० अभियंत्यांच्या गटाची नियुक्तीमहामेट्रो कंपनीस नुकत्याच यशस्वीरीत्या कार्यान्वित झालेल्या नागपूर मेट्रो टप्पा १ आणि पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या मार्ग क्र. १ आणि २ च्या बांधणी, अंमलबजावणी आणि परिचालन आणि देखभालीचा अनुभव आहे. या मार्गाच्या अभियांत्रिकी साहाय्यासाठी महामेट्रोकडून २० तज्ज्ञ अभियंत्यांच्या गटाची नियुक्ती करण्यात आली आहे.