महामुंबईच्या मुली हुशार, गेल्या वर्षीच्या निकालामध्ये यंदा वाढ; नवी मुंबईचा निकाल ९३.७० टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 09:14 AM2024-05-22T09:14:41+5:302024-05-22T09:15:58+5:30
पनवेल तालुक्यातून १० हजार ५५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १० हजार ३२८ विद्यार्थी पास झाले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा टक्केवारीत वाढ झाली आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईमधील १५,७३७ विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. यामधील ८६ विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नाही. १५,६४९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. यापैकी १४,६६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शहराचा एकूण निकाल ९३.७० टक्के लागला आहे. पनवेल तालुक्यातून १० हजार ५५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १० हजार ३२८ विद्यार्थी पास झाले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा टक्केवारीत वाढ झाली आहे.
ठाणे जिल्ह्यात मुलींनी मारली बाजी
ठाणे : ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९२.०८ टक्के लागला आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून मुलींचा ९४.०७ टक्के निकाल लागला आहे. तर मुलांचा निकाल ९०.२३ टक्के इतका लागला आहे. जिल्ह्यात एकूण ८९ हजार ९३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यामध्ये ४४ हजार २८० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, ४५ हजार ६५५ मुले उत्तीर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील एकूण ९८ हजार २ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ५० हजार ७७५ मुले आणि ४७ हजार २२७ मुलींचा समावेश होता. यापैकी ९७ हजार ६६२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात ५० हजार ५९३ मुले आणि ४७,०६९ मुलींनी परीक्षा दिली होती.
रायगडमध्येही मुलींचाच बोलबाला
- अलिबाग : उच्च माध्यमिक बारावी परीक्षेत रायगड विभागाचा निकाल ९४.८३ टक्के लागला आहे. गतवर्षापेक्षा यंदा निकालात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाही मुलींचाच बोलबाला राहिला आहे. जिल्ह्यात ९२.७१ टक्के मुले, तर ९७.०१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
- पंधरा तालुक्यातील १४ हजार ९३६ मुले, तर १४ हजार ५३२ मुली असे एकूण २९ हजार ४६८ विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंद झाली होती. यापैकी १४ हजार ८६० मुले, तर १४ हजार ४८६ मुली असे एकूण २९ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. १३ हजार ७७८ मुले, तर १४ हजार ५३ मुली असे एकूण २७ हजार ८३१ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यात विज्ञान शाखेचा ९८.७४ टक्के, कला शाखेचा ८५.७२ टक्के, तर वाणिज्य शाखेचा ९५.२२ टक्के निकाल लागला आहे.
पालघरमध्ये वसई तालुक्याचा निकाल सर्वाधिक
पालघर : पालघर जिल्ह्याचा बारावी परीक्षेचा निकाल ९३.५१ टक्के लागला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीत मुलींनी यंदाही बाजी (९५.१५ टक्के) मारीत मुलांना (९२.१३ टक्के) मागे टाकले आहे. सर्वाधिक निकाल वसई तालुक्याचा (९५.४४ टक्के) तर सर्वात कमी निकाल डहाणू तालुक्याचा (८७.५१ टक्के) लागला आहे. जिल्ह्यात एकूण २७,२५९ मुलांपैकी २५,११६ मुले उत्तीर्ण झाली असून, २२,९५५ मुलींपैकी २१,८४३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. पालघर जिल्ह्यातून ५०,३९५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.