रायगडमधील महामुंबई प्रकल्प गुंडाळला? राज्य सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 12:44 AM2021-02-04T00:44:37+5:302021-02-04T00:46:02+5:30
MahaMumbai project : रायगड जिल्ह्यातील रोहा, अलिबाग, मुरूड व श्रीवर्धन या चार तालुक्यांतील चाळीस गावांत सिडकोने महामुंबई प्रकल्प प्रस्तावित केला होता.
- कमलाकर कांबळे
नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील रोहा, अलिबाग, मुरूड व श्रीवर्धन या चार तालुक्यांतील चाळीस गावांत सिडकोने महामुंबई प्रकल्प प्रस्तावित केला होता. परंतु, राज्य सरकारच्या निर्देशानुसार आता हा प्रकल्प गुंडाळला आहे. या जागेवर राज्य सरकार विशेष प्रकल्प आणण्याचा विचार करीत असल्याची माहिती सूत्राने दिली.
दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने रायगड जिल्ह्यात तिसऱ्या मुंबईची घोषणा केली होती. अलिबाग, रोहा, मुरूड आणि श्रीवर्धन या चार तालुक्यांतील चाळीस गावांचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला होता. त्यासाठी १९,१४६ हेक्टर जमीन संपादित केली जाणार होती. त्यानुसार सिडकोने कंबर कसली होती. भूसंपादनाच्या कामासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली होती. तसेच जमिनीच्या सर्वेसाठी मेट्रो सेंटरबरोबर करारही केला होता. त्याचे शुल्कसुध्दा मेट्रो सेंटरला अदा केले होते. त्यानुसार लवकरच प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे सिडकोने योजिले होते. परंतु गेल्या आठवड्यात राज्य सरकारने महामुंबईचा प्रकल्प स्थगित करण्याचे निर्देश सिडकोला दिले आहेत. महामुंबईच्या प्रस्तावित जागेवर विशेष प्रकल्प आणण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली.
नवी मुंबई शहराची उभारणी करण्यासाठी राज्य सरकारने सिडकोच्या माध्यमातून रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील ९५ गावांतील १८,८४२ हेक्टर जमीन संपादित केली आहे. त्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर अर्थात नैनाच्या विकासाची जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली आहे. नैना क्षेत्रात ठाणे, उरण, कर्जत, पेण, खालापूर व पनवेल तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. परंतु, आठ वर्षे उलटले तरी सिडकोला नैना क्षेत्राचा विकास करता आलेला नाही. यातच राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातील रोहा, अलिबाग, मुरूड आणि श्रीवर्धन या चार तालुक्यांत महामुंबई या तिसऱ्या शहराची घोषणा केली. नवी मुंबईपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या या नव्या शहराची जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली होती. त्यानुसार सिडकोने तयारीही सुरू केली. मात्र, राज्य सरकारने गेल्या आठवड्यात महामुंबई प्रकल्पाला स्थगिती दिली आहे. त्यानुसार सिडकोनेसुध्दा भूसंपादनाची प्रस्तावित प्रक्रिया गुंडाळल्याचे समजते.
परिसरातील जमिनीचे भाव वधारले
महामुंबईच्या घोषणेमुळे चार तालुक्यांसह परिसरातील जमिनीचे दर वधारले. जमिनी खरेदी-विक्रीच्या व्यवहार तेजीत आले. अनेक गुंतवणूकदारांनी अव्वाच्या सव्वा दराने या परिसरात जमिनी खरेदी केल्या. परंतु आता हा प्रकल्पच रद्द केल्याने गुंतवणूकदार, विकासक व स्थानिक भूधारकांची निराशा झाली आहे..