नवी मुंबई : महापालिकेने अतिक्रमणांच्या विरोधात कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. सोमवारी महापे येथील सुमारे २६0 अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. तसेच या वेळी पाच बेकायदा व्यावसायिक गाळ्यांवरही कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. कोपरखैरणे विभागांतर्गत असलेल्या एमआयडीसीतील महापे परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा झोपड्या उभारल्या आहेत. सोमवारी महापालिकेच्या कोपरखैरणे विभाग कार्यालयाच्या माध्यमातून व एमआयडीसीच्या सहकार्याने येथील तलावाजवळ उभारलेल्या सुमारे २६0 बेकायदा झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. अतिक्र मण विभागाचे उपआयुक्त अमरीश पटनिगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त अशोक मढवी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या कारवाईसाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे वाशी विभागातही अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके यांच्या पथकामार्फत सेक्टर १७ येथील शांती सेंटरमधील दोन पक्क्या स्वरूपाच्या वाढीव बांधकामांवर हातोडा मारण्यात आला. तसेच सेक्टर ३ मधील ज्ञानदीप सोसायटीत मार्जिनल स्पेसवरील अतिक्रमण काढून टाकण्यात आले.दरम्यान, येत्या काळात अतिक्रमण विरोधी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याने बेकायदा बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)
महापेत 260 झोपड्या जमीनदोस्त
By admin | Published: April 25, 2017 1:26 AM