नवी मुंबई: संविधानाला कोणता रंग नसतो, लाल संविधान हातात घेणे गुन्हा ठरत असेल तर तो आम्ही करत राहू. हा देश अदृष्य शक्तीवर नाही तर संविधानावर चालतो. महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य आहे येथे बटेंगे तो कटेंगे भाषा चालणार नाही असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.
नवी मुंबईत बेलापूर मतदार संघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार संदीप नाईक यांच्या प्रचार सभेत सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्यांनी भाजप सरकार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केली. लाल रंगाचे संविधान हातात घेतले म्हणून अर्बन नक्षलवादाची उपमा दिली. लाल रंगाचे संविधान हातात घेणे गुन्हा असेल तर तो आम्हास मान्य आहे. आम्हाला खुशाल अटक करा. भाजपाने राज्यातील राजकारणाचा दर्जा घसरवला आहे. त्यांचे नेते महिलांविषयी अनुद्गार काढत आहेत. महिला दुस-या पक्षाच्या सभेला गेल्या तर फोटो काढा म्हणतात. बटेंगे तो कटेंगे ची भाषा वापरत असून आता हे सरकार आपल्याला बदलायचे आहे असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनीही भाजपवर टिका केली. भाजप अडचणीत आली की ते धर्म धोक्यात आल्याची भाषा करतात. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे नेते मागील काही महिन्यात भडकाऊ भाषणे देत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. भाजपने महागाई वाढवून जनतेच्या खिशातील पैसे काढण्याचे काम केले आहे. एका कुटुंबावर वर्षाला 89 हजार रूपयांचा बोजा वाढवला आहे. शेकडो कोटींची जाहिरात करून परत सत्तेवर येण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका केले. खासदार निलेश लंके यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी खासदार संजय पाटील, बाळ्यामामा म्हात्रे, बेलापूर चे उमेदवार संदीप नाईक यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.