सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी बेलापूर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्याविरोधात तुतारी फुंकली आहे. त्यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त झाली. त्यामुळे बेलापूर मतदारसंघच नव्हे, तर ऐरोली मतदारसंघातही भाजपचा एकही पदाधिकारी उरला नसल्याचे चित्र आहे.
या पेचप्रसंगाला भाजपचे ऐरोलीचे उमेदवार गणेश नाईक आणि विशेषत: बेलापूरच्या उमेदवार मंदा म्हात्रे कशा प्रकारे तोंड देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीवेळीदेखील नाईक परिवाराने दोन जागा मागितल्या असता त्यांना एकच जागा दिली होती. त्यामुळे यंदा काही केल्या संधी गमवायची नाही, या निर्धाराने वर्षभर आधीच संदीप नाईक कामाला लागले होते. यासाठी त्यांनी नियोजनबद्धरीत्या भाजप जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर नाईक परिवाराला साथ देतील, अशाच व्यक्तींना मुख्य पदांवर घेऊन मोर्चेबांधणी केली आणि नवी मुंबईतील भाजपवरच कब्जा केला. आता जिल्हा कार्यकारणीच उरली नसल्याने कार्यकारिणीविना प्रचार करण्याची वेळ भाजपच्या उमेदवारांवर आली आहे.
धडा शिकवल्याची चर्चा
विधानसभा निवडणुकीत नाईक परिवाराने बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही मतदारसंघांतून भाजपकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने केवळ ऐरोलीत गणेश नाईक यांना उमेदवारी देऊन संदीप नाईक यांना डावलले. त्यामुळे जिद्दीला पेटलेल्या संदीप नाईक यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. त्यापूर्वी, त्यांनी भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने जिल्हा कार्यकारिणी बरखास्त झाली आहे. त्यामुळे ऐन निवडणूक काळात नवी मुंबईतील कार्यकारिणी बरखास्त करून नाईकांनी भाजपला धडा शिकलवल्याची चर्चा आहे.