लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: संदीप नाईक यांना बेलापूरमधून उमेदवारी नाकारण्यात आल्याने गणेश नाईक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातून संजीव नाईक इच्छुक होते. मात्र, शेवटच्या क्षणी त्यांचा पत्ता कट करून ती जागा शिंदेसेनेचे नरेश म्हस्के यांना बहाल केली. त्यामुळे नाराज गणेश नाईक यांची समजूत काढताना विधानसभेच्या दोन जागा देण्याचे भाजप नेतृत्वाने कबूल केल्याचे बोलले जात आहे. परंतु, पहिल्या यादीत संदीप नाईक यांना स्थान नसल्याने नाईक समर्थक नाराज आहेत.
२ दिवसांत ठरवणार राजकीय भूमिका
गणेश नाईक शरद पवार गटात प्रवेश करतील, अशीही चर्चा आहे. संदीप नाईक बेलापूरमधून निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्यामुळे भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन ते अपक्ष निवडणूक लढवतील, असेही बोलले जात आहे. तर प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील दोन दिवसांत नाईक आपली राजकीय भूमिका स्पष्ट करतील, अशी माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्याने दिली.