कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन शरद पवार गटात प्रवेश केला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नवी मुंबईत येऊन बेलापूरमधून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रेंविरोधात त्यांची चुरस पाहायला मिळणार आहे.
ऐरोलीतून भाजपने गणेश नाईक यांना पुन्हा संधी दिली आहे. महाविकास आघाडीतून त्यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी मिळेल, हे नसले तरी या निमित्ताने नाईक पिता-पुत्रात प्रचाराच्या मुद्यावरून पेच निर्माण होणार आहे.
गणेश नाईक यांनी सोमवारपासून प्रचाराचा शुभारंभ केला. तर संदीप नाईक यांनी मंगळवारी हाती तुतारी घेतली. गणेश नाईक यांच्या विरोधात प्रचार करणार का, या प्रश्नावर संदीप नाईक यांनी मौन बाळगले आहे. तर गणेश नाईक यांनीही या प्रश्नाला सध्या बगल दिली आहे. बेलापूर येथून भाजपने मंदा म्हात्रे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. आपल्या प्रचारासाठी गणेश नाईक यांनी बेलापूरमधून संदीप यांच्या विरोधात प्रचारात उतरावे, यासाठी त्या नक्कीच प्रयत्न करतील. तसे झाल्यास गणेश नाईकांना नाइलाजास्तव पुत्र संदीप यांच्याविरोधात प्रचाराला उतरावे लागेल की, ते नकार देतील, याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत.