Maharashtra Bandh : नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 11:55 AM2018-07-26T11:55:41+5:302018-07-26T12:05:26+5:30
अफवा पसरुन पुन्हा तणाव निर्माण होऊ नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई - आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाकडून बुधवारी (25 जुलै) मुंबई, ठाणे, कल्याणसह अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला होता. मुंबईतील बंदचे पडसाद राज्यभर उमटल्याचे दिसून आले. कळंबोलीत या बंदला हिंसक वळण लागले, तर अनेक ठिकाणी दगडफेकही करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून नवी मुंबईतील अनेक भागांमधील मोबाईल इंटरनेट सेवा गुरुवारी बंद करण्यात आली आहे.
शीव-पनवेल, ठाणे-बेलापूर, पामबीच मार्ग तसेच पनवेलमधील कळंबोली येथे जमावाने जाळपोळ केली. घणसोली, ऐरोली येथे रेल रोको करण्यात आला. मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ केली. सध्या नवी मुंबईत शांतता असली तरी अफवा पसरुन पुन्हा तणाव निर्माण होऊ नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवी मुंबईसह पनवेलमध्ये देखील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सरकारच्या सूचनेनुसार इंटरनेट सेवा ही तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे असे मेसेज कंपनीने आपल्या ग्राहकांना पाठवले आहेत. खारघर, कामोठे, कळंबोली, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, पनवेल परिसरात हजारो इंटरनेट यूजर्सना याचा फटका बसला आहे.