१२१ कोटी खर्चून नवी मुंबईत साकारणार महाराष्ट्र भवन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 09:17 AM2024-07-12T09:17:01+5:302024-07-12T09:17:13+5:30
सिडकोने विविध राज्यांच्या भवनसाठी वाशी परिसरात भूखंड दिले आहेत.
नवी मुंबई : पंधरा वर्षांपासून कागदावरच असलेला महाराष्ट्र भवनचा प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर सिडकोने या प्रकल्पाच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करून वाशी सेक्टर ३० ए येथील सुमारे आठ हजार चौरस मीटर भूखंडावरील प्रस्तावित महाराष्ट्र भवनच्या उभारणीसाठी १२१ कोटी खर्चाच्या निविदा मागविल्या आहेत.
सिडकोने विविध राज्यांच्या भवनसाठी वाशी परिसरात भूखंड दिले आहेत. विशेष म्हणजे त्यावर संबंधित राज्यांनी दिमाखात वास्तू उभारल्या आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्र भवनसुद्धा उभारले जावे, अशी मागणी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह राजकीय मंडळीकडून केली जात होती. त्यानुसार सिडकोने वाशी रेल्वे स्थानकाजवळ सुमारे दोन एकचा भूखंड महाराष्ट्र भवनसाठी आरक्षित ठेवला होता. अनेक वर्षांपासून तो पडून असल्याने आ. मंदा म्हात्रे यांनी पाठपुरावा केला होता. निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे भवन दोन वर्षांत पूर्ण होईल, असा विश्वास सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल यांनी व्यक्त केला आहे.
१२ मजल्यांची अत्याधुनिक वास्तू
या भवनची इमारत १२ मजल्यांची असेल. यात छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, जिजाऊ, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आदी महापुरुषांचे पुतळे उभारण्यात येणार आहेत. तसेच शयनगृहाच्या ११ खोल्या, ७२ डबल बेडच्या खोल्या अतिथीगृह आणि इतर एकूण १६१ खोल्या असून, इतर सुविधांचा समावेश केला जाणार आहे. त्याचप्रमाणे पार्किंग व्यवस्था, कॉन्फरन्स हॉल, रेस्टॉरंटची सुविधा उपलब्ध असणार आहे.