महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित ८ श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू, २४ जणांवर उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 10:00 PM2023-04-16T22:00:57+5:302023-04-16T22:41:47+5:30

जखमींवरील उपचाराचा खर्च शासन करणार आहे. तर उपचारादरम्यान जे मृत झालेत त्यांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली

Maharashtra Bhushan Award Ceremony: 8 dead due to heat stroke, 24 treated | महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित ८ श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू, २४ जणांवर उपचार

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित ८ श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू, २४ जणांवर उपचार

googlenewsNext

नवी मुंबई - महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी लाखोंच्या संख्येने श्रीसेवक खारघरच्या मैदानात जमले होते. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक नेते, आमदार उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्याला लाखो श्रीसेवकांचा जनसमुदाय भरउन्हात जमा झाला होता. परंतु उष्माघाताचा त्रास झाल्याने ८ श्रीसेवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

या सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यातील अनेकांवर सध्या नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जात जखमींची विचारपूस केली. त्यानंतर शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला, मुख्यमंत्री म्हणाले की, आजच्या सोहळ्याला जे श्रीसेवक आले होते. त्यातील काहींना उष्माघाताचा त्रास झालेला आहे. ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांची भेट घेऊन मी विचारपूस केली. चांगल्यात चांगले उपचार देण्याची सूचना डॉक्टरांना केली आहे. यात ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. 

त्याचसोबत जखमींवरील उपचाराचा खर्च शासन करणार आहे. तर उपचारादरम्यान जे मृत झालेत त्यांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. झालेली दुर्घटना अतिशय दु:खद आहे. लाखो लोकांचा जनसमुदाय आला. कार्यक्रम सुरळीत पार पडला. परंतु शेवटी अशाप्रकारे घटना घडणे हे खूप दुर्दैवी आहे. मी राजकीय भाष्यावर बोलणार नाही. श्रीसेवक जे उपचार घेतायेत त्यांची सुविधा, सोय करणे हे प्राधान्य आहे. विशेष अधिकारी नेमणूक करण्यात आली आहे. कुठलीही गैरसोय होणार नाही अशी सूचना प्रशासनाला दिले आहेत. सध्या २४ लोकांवर उपचार सुरू आहेत. ५० जणांवर उपचार करून घरी सोडले आहेत. महिला, पुरुषांचा मृतांमध्ये सहभाग आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.  

श्रीसदस्यांच्या मृत्यूची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहोळ्यात सहभागी काही श्रीसदस्यांचे उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी या साधकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जे लोक उपचार घेत आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 
 

सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - काँग्रेस
दरम्यान, सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम भर दुपारी एप्रिल महिन्यात ठेवला. या निष्काळजीपणामुळे निष्पाप लोकांचा जीव गेला. अनेकजण गंभीर आहेत. सरकारने केलेला हा मनुष्यवध आहे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. 

Web Title: Maharashtra Bhushan Award Ceremony: 8 dead due to heat stroke, 24 treated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.