नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदारसंघात एकूण १५ उमेदवारांपैकी दोन उमेदवार अवैध तर दोघांनी माघार घेतल्यामुळे आता ११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात चार लाख ६१ हजार ३४९ मतदार आहेत.ऐरोली विधानसभा मतदारसंघात ४३३ मूळ मतदान केंद्रे असून, सात सहायक मतदान केंद्रे अशी एकूण ४४० मतदान केंद्र्रांची संख्या आहे. मतदारांना त्रास होऊ नये, म्हणून इमारतीच्या तळमजल्यावर घेण्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. काही ठिकाणी अंध, दिव्यांग, गर्भवती महिला तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी लिफ्टची सोय करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदार केंद्रावर पाच कर्मचारी नेमण्यात येणार असून वाशी, तुर्भेपासून दिघापर्यंत एकूण ८६ मतदान केंद्रांवर सुमारे ३००० कर्मचारी निवडणुकीचे काम पाहणार आहेत.निवडणूक चाचणी १२ आॅक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. तर १४, १५ आणि १६ आॅक्टोबर रोजी मतदान मशीनची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. २० आॅक्टोबर रोजी मशीन साहित्य आणि पेट्या सर्व मतदान केंद्रांकडे रवाना होतील. चार भरारी पथके नेमण्यात आली आहेत. आचारसंहिता जाहीर झाल्यापासून ऐरोली विधानसभा मतदारसंघात आचारसंहिताभंगाचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच निवडणुकीच्या कालावधीत गैरहजर असलेल्या ४५९ कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.ऐरोली मतदारसंघातील २३ केंद्रे वगळता इतर मतदान केंद्रे तळमजल्यावरच राहतील. दिव्यांग, गरोदर महिला, अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रापर्यंत रिक्षाची विनामूल्य सेवा पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर दोन समन्वयक असतील, अशी माहिती ऐरोली विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी अभय करगुटकर यांनी दिली.मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतदानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे आवाहन करगुटकर यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला ऐरोली विधानसभा निवडणूक समन्वयक गणेश आघाव उपस्थित होते.
Maharashtra Election 2019: ऐरोली मतदारसंघात ८६ केंद्रे; गैरहजर राहिलेल्या ४५९ कर्मचाऱ्यांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 6:08 AM