नवी मुंबई : राज्यातील चार बंडखोर उमेदवारांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे; परंतु उरण मतदारसंघातील बंडखोर उमदेवार महेश बालदी यांच्यावर अद्याप काहीही कारवाई केलेली नाही. यामुळे या बंडखोरीला पक्षाचे पाठबळ असल्याचा समज निर्माण होऊ लागला आहे. पनवेलमधून शिवसेनेने माघार घेऊन युती धर्माचे पालन केले; परंतु उरणमध्ये मात्र भाजपने बंडखोरी माघारी घेतली नसल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्येही नाराजी निर्माण झाली आहे.राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये शिवसेना व भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी बंडखोरांना उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन केले होते. जे माघार घेणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. भाजपने मीरा-भार्इंदरमध्ये आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात बंडखोरी करणाºया गीता जैन यांच्यासह राज्यातील चार ठिकाणच्या बंडखोरांवर कारवाई केली आहे; परंतु रायगड जिल्ह्यातील उरण मतदारसंघामधील बंडखोर उमेदवार महेश बालदी यांच्यावर अद्याप काहीही कारवाई केलेली नाही. युतीमध्ये ही जागा शिवसेनेला देण्यात आली असून, विद्यमान आमदार मनोहर भोईर निवडणूक लढवत आहेत. २०१४ च्या निवडणुकीमध्ये भाजपचे महेश बालदी तिसºया क्रमांकावर होते.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये येथूनही शिवसेना उमेदवाराला मोठे मताधिक्य मिळाले होते. युती झाल्यामुळे शिवसेनेला त्याचा लाभ झाला असता; परंतु बालदी यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. बालदी यांनी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांचा अर्ज भरताना भाजपचे पनवेल व रायगडमधील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूरही अर्ज भरताना उपस्थित होते.पनवेलमध्ये शिवसेनेचे बबन पाटील यांनी बंडखोरी केली होती. त्यांनी माघार घेतली तर उरणमध्ये भाजप माघार घेईल, अशी चर्चा पहिल्यांदा सुरू होती. पनवेलमधून शिवसेनेने माघार घेऊन युती धर्माचे पालन केले; परंतु उरणमध्ये भाजपने बंडखोरी कायम ठेवली आहे. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असल्याने बालदी यांच्यावर कारवाई केली जाईल, असे बोलले जात होते; परंतु अद्याप काहीही कारवाई झालेली नाही. बालदी यांनी नगरसेवक ते नगराध्यक्ष व जेएनपीटीचे विश्वस्त म्हणूनही काम केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विश्वासू म्हणूनही ते ओळखले जातात. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे पाठबळ असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचेही बोलले जात आहे. तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारीही त्यांचाच प्रचार करत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, उरणमधील बंडखोरी पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांच्या लक्षात आली असून ते यावर उचित निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.कारवाई न झाल्यास चुकीचा संदेश- रायगड जिल्ह्यातील पनवेल मतदारसंघामध्ये शिवसैनिकांनी बंडखोरी मागे घेऊन भाजपला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. त्याच धर्तीवर उरणमध्येही भाजप-शिवसेना उमेदवाराला सहकार्य करेल, अशी अपेक्षा सर्वांना होती; परंतु भाजप उमेदवाराची बंडखोरी कायम असून त्यांच्यासोबत तालुक्यातील पदाधिकारीही आहेत.- बंडखोर उमेदवारावर कारवाई झाली नसल्यामुळे त्याचा चुकीचा संदेश जिल्ह्यात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बंडखोर उमेदवाराला पक्षाचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचा समज निर्माण होऊ शकतो.नेत्यांच्या छायाचित्रांचाही वापरभाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तयार केलेल्या पत्रकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे फोटोही वापरले आहेत.याविषयी शिवसेना पदाधिकाºयांनी भाजपच्या नेत्यांना माहिती दिली आहे; परंतु अद्याप त्याविषयी पक्षाकडून ठोस भूमिका घेण्यात न आल्याने मतदारसंघात संभ्रम आहे.
Maharashtra Election 2019 : उरणमध्ये भाजपची दुटप्पी भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 5:04 AM