नवी मुंबईसह पनवेल, उरण विधानसभा मतदारसंघांमध्ये गुरुवारी प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत नामनिर्देशनपत्र भरले. बेलापूरमधून भाजपच्या मंदा म्हात्रे, राष्टÑवादीचे अशोक गावडे व मनसेचे गजानन काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, तर पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उरण विधानसभा मतदारसंघातून शेकापचे विवेक पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करीत आपले नामांकन सादर केले.बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांचा अर्ज सादरनवी मुंबई : विधानसभेच्या बेलापूर मतदारसंघातून भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी शक्तिप्रदर्शन करीत गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच राष्ट्रवादीकडून अशोक गावडे तर मनसेकडून गजानन काळे यांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले. आतापर्यंत १३ अर्ज दाखल झाले आहेत. तर आजच्या दिवसभरात आठ अर्ज सादर करण्यात आले. अर्ज भरण्याचा उद्याचा अखेरचा दिवस आहे.मंदा म्हात्रे या बेलापूरच्या विद्यमान आमदार आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी गणेश नाईक यांचा पराभव केला होता. या वेळी पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिल्याने त्यांचा उत्साह दुणावला आहे. त्यामुळे गुरुवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज सादर केला. या वेळी त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, रवींद्र इथापे, माजी महापौर सागर नाईक व माजी नगरसेवक संपत शेवाळे यांच्यासह युतीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. या वेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, भालचंद्र नलावडे व जी. एस. पाटील यांच्यासह राष्ट्रवादी व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मनसेचे गजानन काळे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज सादर केला.प्रशांत ठाकूर यांनी दाखल केला उमेदवारी अर्जपनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघातून (१८८) विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपच्या वतीने गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी पनवेल शहरात करण्यात आलेल्या जोरदार शक्तिप्रदर्शनात भाजप, आरपीआय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पनवेल विधानसभा मतदारसंघातून प्रशांत ठाकूर यांनी दोन वेळा आमदारकी भूषविली आहे. ही त्यांची तिसरी टर्म आहे. युतीच्या माध्यमातून प्रशांत ठाकूर यांना उमेदवारी मिळाली असली तरी सेनेने पनवेल विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी केल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दाखविली नाही. भाजपच्या शहरातील मध्यवर्ती कार्यालयाजवळून काढलेली रॅली शहरातील महत्त्वाच्या ठिकाणावरून प्रांत कार्यालयात पोहोचली. हजारोंच्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये या वेळी जल्लोष पाहावयास मिळाला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रशांत ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेतून पनवेल शहराचा कायापालट करणार असल्याचे सांगितले. सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त मते मिळवून विजयश्री प्राप्त करणार असल्याचा दावा, या वेळी त्यांनी केला. प्रशांत ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज भरताना माजी खासदार रामशेठ ठाकूर, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक जगदीश गायकवाड, लक्ष्मण पाटील उपस्थित होते.उरणमधून विवेक पाटील निवडणूक रिंगणातउरण : उरण मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीचे शेकाप उमेदवार विवेक पाटील यांनी मोठा गाजावाजा करून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी-काँग्रेसने या वेळी पाठ फिरवल्याने आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याची चर्चा उरण मतदारसंघात सुरू झाली आहे.गुरुवारी शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीच्या नावाखाली शेकापचे विवेक पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, बाळाराम पाटील आदी उपस्थित होते. जासई फाटा येथून निवडणूक कार्यालयापर्यंत सकाळी १० वाजता मिरवणूकही काढण्यात आली. या वेळी मित्रपक्ष व आघाडीचा एकही कार्यकर्ता मिरवणुकीत सहभागी झाला नाही. दरम्यान, शेकापबरोबर फरफटत जाण्यापेक्षा स्वतंत्र निवडणूक तयारी काँग्रेस आणि मनसेने केली आहे. दोन्ही पक्षांचे उमेदवार शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे. विवेक पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, सेना-भाजपवर टीका केली. जो पक्षाचा राहिला नाही, ज्याला पक्षाने उमेदवारी नाकारली आणि ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली, असा महेश बालदी जनतेचा कसा होईल, अशी टीका त्यांनी केली. उरण मतदारसंघातील सेनेचे आमदार मनोहर भोईर यांच्यावर जोरदार टीका करताना विवेक पाटील यांनी निष्क्रिय आमदार म्हणून उल्लेख केला.
Maharashtra Election 2019 : नवी मुंबईत प्रमुख उमेदवारांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 3:25 AM