पोलिसांच्या नजरकैदेत ईव्हीएम मशिन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 12:33 AM2019-10-23T00:33:28+5:302019-10-23T00:34:43+5:30
Maharashtra Election 2019: मतयंत्रे ठेवलेल्या ठिकाणी कार्यकर्तेही तळ ठोकून; मतदान मोजणीसाठी तयारी सुरू
नवी मुंबई : बेलापूर व ऐरोली विधानसभेच्या निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया झाल्यानंतर सिलबंद ईव्हीएम मशिन दोन्ही मतदारसंघातील स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी कोणताही गैरप्रकार घडू नये, याकरिता तीनस्तरीय पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्याशिवाय सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही पोलिसांचा तिसरा डोळा कार्यरत करण्यात आला आहे.
सोमवारी मतदानाची प्रक्रिया उरकल्यानंतर रात्री उशिरापर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशिन ठरलेल्या स्ट्राँगरूममध्ये जमा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ऐरोली मतदारसंघातील ४४० केंद्रातील ईव्हीएम मशिन व व्हीव्हीपॅट ऐरोलीतील सरस्वती विद्यालयात तयार करण्यात आलेल्या स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत.
बेलापूर मतदारसंघातील ३९० केंद्रातील ईव्हीएम मशिन व व्हीव्हीपॅट नेरुळमधील आगरी कोळी भवन येथे ठेवण्यात आल्या आहेत. या दोन्ही मतदारसंघाची मतमोजणी गुरुवारी त्याच ठिकाणी होणार आहे. यानुसार मतमोजणीपर्यंत या मशिन पूर्णपणे सुरक्षित राहाव्यात, याची खबरदारी नवी मुंबई पोलिसांकडून घेण्यात आली आहे. त्याकरिता दोन्ही ठिकाणच्या स्ट्राँगरूमच्या आत व बाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.
त्यामध्ये पोलिसांसह एसआरपी, सीआयएसएफ यांच्या तुकड्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून अज्ञात व्यक्तीला स्ट्राँगरूमच्या आसपासही फिरण्यावर आक्षेप घेतला जात आहे ज्या खोलीत मशिन ठेवण्यात आल्या आहेत, त्या खोलीसह भोवतालच्या परिसरात सीसीटीव्हीचे जाळे तयार करण्यात आले आहे.
मतदानानंतर राज्यभरातील ईव्हीएम मशिनमध्ये छेडछाड केली जात असल्याचा अनेक राजकीय पक्षांचा आरोप आहे. यामुळे अनेक ठिकाणी ईव्हीएमला उघड विरोधही होत आहे. त्यामुळे मतदानानंतर सिलबंद करण्यात आलेल्या मशिन स्ट्राँगरूममध्ये पोलिसांच्या नजरकैदेत ठेवण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी केवळ निवडणूक विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनाच प्रवेश दिला जात आहे.
स्ट्राँगरूमच्या प्रवेशद्वारावर शस्त्रधारी पोलीस नेमण्यात आले आहेत. त्यानंतरही प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून यंत्रणेला हाताशी धरून मशिनसोबत छेडछाड केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशा उमेदवारांकडून निवडक कार्यकर्त्यांची फळी तयार करून स्ट्राँगरूमच्या बाहेर ठाम मांडून बसवण्यात आल्याचेही चित्र दिसून येत आहे.
उरणमधील जासई केंद्रावर मतयंत्रे सुरक्षित
उरणमधील ३२७ मदतकेंद्रावरून मतयंत्रे जासई येथील मतमोजणीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्थेत आणण्यात आली. मंगळवारी पहाटेपर्यंत हे काम सुरू होते. सशस्त्र कमांडो, केंद्रीय सुरक्षा बल, पोलीस आदी चारस्तरीय सुरक्षा यंत्रणेच्या कडक जागत्या पहाºयात मतयंत्रे ठेवण्यात आली आहेत.