- कुमार बडदेमुंब्रा : उच्चदाबाच्या वीजवाहिनीच्या झटक्यामुळे आठ वर्षांपूर्वी दोन्ही हात गमावलेल्या मुंब्य्रातील शंकर मंदिर परिसरातील पॅराडाइज हाइट्समध्ये राहत असलेल्या सय्यद फैजान मेहंदी या १९ वर्षांच्या दिव्यांग तरुणाने शिवाजीनगरमधील सरस्वती विद्यालयामधील मतदानकेंद्रावर उजव्या पायाच्या अंगठ्याने सोमवारी पहिले मतदान केले.
पहिल्यांदा मतदान करताना त्याच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. त्याच्या उत्साहाकडे बघून मतदानकेंद्रातील अधिकारी-कर्मचारीही अवाक झाले होते. मतदानकेंद्र अधिकाऱ्यांनी त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला शाई लावून त्याने त्याचा मतदानाचा हक्क बजावल्याचे साक्षांकित केले. त्याचे नाव ज्या मतदानकेंद्रावर होते, ते डोंगरावर असल्यामुळे तेथपर्यंत चालत जाण्याशिवाय पर्याय नसल्याने त्याची दमछाक झाल्याचे त्यानेच लोकमतला सांगितले.
सर्वसामान्य मतदारांनी दाखवलेल्या निरुत्साहामुळे पहिल्या चार तासांमध्ये मुंब्रा-कौसा परिसरातील बहुतांश मतदानकेंद्रांवर मतदानासाठी तुरळक गर्दी होती. मतदारांना पावसाचा त्रास होऊ नये, यासाठी मतदानकेंद्रांच्या परिसरात मंडप टाकण्यात आले होते. यामुळे अनेक केंद्रांच्या परिसरातील जमिनीवर सूर्याची किरणे थेट न पोहोचल्याने मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे केंद्राच्या परिसरात चिखल झाला होता. त्यावरून, अपक्ष उमेदवार युसुफ खान यांच्यासह काही घसरून पडले. तसेच काही ठिकाणी दिव्यांगांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या रॅम्पच्या बाजूने कठड्याची व्यवस्था करण्यात आली नसल्यामुळे त्यावरून चालताना दिव्यांगांना इतर मतदारांचा आधार घ्यावा लागला.
मकसुद इस्माईल शेख, नासिरा रईस खान, राजेंद्रप्रसाद यादव या मतदारांच्या नावांचा समावेश ते राहत असलेल्या ठिकाणांपासून चार ते सात किलोमीटर दूरवर असलेल्या मतदानकेंद्रांमधील याद्यांमध्ये करण्यात आला होता. यामुळे ते त्रस्त झाले होते. कौसा परिसरातील आयडियल मार्केट परिसरातील रस्त्यावर जमा झालेल्या पाण्यामुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले होते. त्यातून वाट काढत मतदानकेंद्रापर्यंत पोहोचताना मतदारांना कसरत करावी लागली.