नवी मुंबई : ऐरोली मतदारसंघामध्ये माजी मंत्री गणेश नाईक यांनी ७८ हजार ४९१ मतांनी विजय मिळविला आहे. बालेकिल्ला टिकविण्यात नाईक परिवारास यश आले असले, तरी विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या उमेदवारांनी मिळविलेली मतेही लक्षवेधी ठरली आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या काळात ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या मतदारसंघामध्ये ऐरोलीचाही समावेश आहे. २०१४ च्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना उमेदवारीही जाहीर केली; परंतु बेलापूरमधून गणेश नाईकांना उमदेवारी दिली नाही, यामुळे वडिलांसाठी संदीप नाईक यांनी त्यांची उमेदवारी सोडली.
राष्ट्रवादी काँगे्रसला तुल्यबळ उमेदवार मिळाला नाही. यामुळे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे पदाधिकारी असलेले गणेश शिंदे यांना उमेदवारी दिली. मनसेने अखेरच्या क्षणी नीलेश बाणखेले यांना उमेदवारी दिली. नाईकांच्या तुलनेमध्ये सर्व उमेदवार कमकुवत वाटत होते. मतदारांमध्येही यंदा निरुत्साह दिसला असून फक्त ४२ टक्के मतदान झाले होते.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून गणेश नाईक यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. त्यांना एकूण एक लाख १४ हजार ६४५ मते मिळाली. राष्ट्रवादी काँगे्रसचे गणेश शिंदे यांना ३६ हजार १५४ मते मिळाली. मनसेला २२ हजार ८१८ मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी व मनसेचे उमेदवार नवखे असूनही त्यांनी चांगली मते मिळविली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश ढोकणे यांनीही तब्बल १३ हजार ४२४ मते मिळविली आहेत. मतदारांचे स्थलांतर झाले नसते तर अजून कडवे आव्हान भाजपला मिळाले असते, अशी चर्चा सुरू झाली होती.
ऐरोलीमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळविल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. बेलापूर मतदारसंघामधील अनेक पदाधिकारीही जल्लोषात सहभागी झाले होते. २०१४ मध्ये निसटता पराभव झाल्याचे शल्य नाईक समर्थकांमध्ये होते. या वेळच्या निवडणुकीमध्ये मोठे मताधिक्य मिळाल्याने ढोल-ताशे वाजवून पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. माझी खासदार संजीव नाईक, संदीप नाईक, महापौर जयवंत सुतार, माझी महापौर सागर नाईक, नगरसेवक सूरज पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय विकासकामे केली आहेत, यामुळे राज्यातील जनतेने विश्वास दाखवून निवडून दिले आहे. यापुढेही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू राहतील.- गणेश नाईक,विजयी उमेदवार, ऐरोली