Maharashtra Election 2019 : खडसे, तावडे राष्ट्रवादीच्या संपर्कात, शरद पवार यांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 05:59 AM2019-10-04T05:59:35+5:302019-10-04T06:00:00+5:30
भाजपचे मंत्री विनोद तावडे, माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी गुरुवारी केला.
ठाणे : भाजपचे मंत्री विनोद तावडे, माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी गुरुवारी केला. भाजपच्या नेत्यांच्या मनातील ही खदखद आजची नसून अनेक महिन्यांची आहे. तेव्हापासून हे सर्व नेते आमच्या संपर्कात असल्याची पुस्ती पवार यांनी जोडली. त्यांच्याबाबत योग्यवेळी निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.
ईडीच्या चौकशीत आपले नाव गोवण्याचा प्रयत्न हा केवळ माझा एकट्याचा प्रश्न नसून विरोधकांचा आवाज दाबून टाकण्यासाठी ईडी, सीबीआय यासारख्या यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे. ईडीच्या या प्रेमप्रकरणानंतर लोकांचा प्रतिसाद वाढला आहे, असे सांगत यावेळी परिवर्तन होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शरद पवार हे गुरुवारी राष्टÑवादीचे मुंब्रा-कळवा मतदारसंघाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ठाण्यात आले होते. त्यावेळी पवार बोलत होते.
पवार म्हणाले की, ज्यावेळी सत्ताधारी पक्ष म्हणून लोकांपुढे जाण्यासाठी काहीही मुद्दे नसतात, तेव्हा धार्मिक मुद्दे उपस्थित करून भावनिक आवाहन केले जाते. काश्मीर आणि राम मंदिर हे विधानसभा निवडणुकीचे मुद्दे असू शकत नाहीत. राज्यात बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. मात्र, त्यावर हे सरकार बोलायला तयार नाही. सत्तेचा गैरवापर करून ईडी आणि सीबीआयसारख्या यंत्रणांचा ससेमिरा विरोधकांच्या मागे लावून दिला जात आहे. यात ईडीला मी दोष देणार नाही. ईडीला वरून सूचना आल्याने त्यांनी त्याचे पालन केले.
माझ्या ५० वर्षांच्या सामाजिक जीवनात तरुणवर्गाचा इतका उदंड प्रतिसाद मी पहिल्यांदाच अनुभवत असल्याचे सांगत पवार यांनी आव्हाडांचे कौतुक केले. महाराष्ट्रात काढलेल्या दौऱ्यांमध्ये ८० टक्के तरुण मतदार विद्यमान सरकारच्या कारभारावर नाराज असल्यादा दावा त्यांनी केला.
अजितदादांच्या नाराजीसंदर्भात विचारले असता पवार म्हणाले की, पवार कुटुंबीय कोणत्याही प्रकारे हवालदिल झाले नव्हते. माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे ते भावुक झाले होते. राजकारणात कोणी कुठे जायचे, हा ज्या त्या लोकांचा अधिकार असतो. मात्र, मतदार फार सुज्ञ असतात. ते त्यांचा अधिकार योग्य पद्धतीने बजावतील, असा टोला पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना लगावला.
लपवलेले गुन्हे जाहीर करावेत
मुख्यमंंत्र्यांनी आपल्यावरील गुन्हे लपवले असतील, तर ते त्यांनी जाहीर करावेत. जी काही माहिती असेल, ती त्यांनी द्यावी. जनतेची व आयोगाची दिशाभूल करू नये, असे मत पवार यांनी व्यक्त केले. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे अयोग्य असल्याचे सांगितले.
गणेश नाईक यांनी सन्मान गमावला
भाजपमध्ये योग्य सन्मान मिळणार नाही, हे माहीत असतानाही गणेश नाईक भाजपमध्ये गेले. त्यामुळे त्यांना आता अपमान भोगावाच लागेल, असा टोला पवार यांनी लगावला.
ईडी, सीबीआयचा धाक दाखवून दबाव - कन्हैया कुमार
शरद पवारांवर दाखल केलेला गुन्हा म्हणजे विरोधकांवर दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचे उदाहरण आहे, असे उद्गार युवानेते कन्हैया कुमार यांनी काढले. ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून दबाव निर्माण केला जात असतानाच आ. जितेंद्र आव्हाड हे आपल्या समतामूलक विचारधारेवर ठाम आहेत. समतेसाठी, धर्मनिरपेक्षतेसाठी ते लढत आहेत. त्यामुळेच मी त्यांच्या प्रचारासाठी ठाण्यात आलो आहे. यापुढेही त्यांचा प्रचार करणार आहे, असेही कन्हैया कुमार यांनी सांगितले.