Maharashtra Election 2019 : नाईक कुटुंबीय उतरणार मंदा म्हात्रे यांच्या प्रचारात?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 05:56 AM2019-10-04T05:56:05+5:302019-10-04T05:56:58+5:30
माजी गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे हे दोघे एकाच पक्षातून वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे त्यांच्यातील राजकीय विसंवाद या निवडणुकीपुरता तरी संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे.
नवी मुंबई : माजी गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे हे दोघे एकाच पक्षातून वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे त्यांच्यातील राजकीय विसंवाद या निवडणुकीपुरता तरी संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी भाजपच्या उमेदवार असलेल्या मंदा म्हात्रे यांच्या प्रचारात नाईक कुटुंबीय उतरणार का, याविषयी तर्क-वितर्क लावले जात आहेत.
नवी मुंबईच्या राजकारणात गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यात कायमस्वरूपी वाद राहिला आहे. राष्ट्रवादीत असतानाही दोघांनी नेहमीच ऐकमेकांचा दु:स्वास केला. विधानसभेच्या २०१४च्या निवडणुकीत बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्या विरोधात भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली. या निवडणुकीत अवघ्या दीड हजार मतांनी नाईक यांचा पराभव करीत त्या जायंट किलर ठरल्या.
गणेश नाईक यांनी आता भाजपात प्रवेश केला आहे. बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. त्यानुसार त्यांनी तयारी सुरू केली होती; परंतु भाजपने त्यांचा पत्ता कट करीत पुन्हा मंदा म्हात्रे यांना संधी दिली आहे. तर नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांना ऐरोलीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली. या घटनेला दुसऱ्या दिवशी नाट्यमय वळण प्राप्त झाले. नाईक यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांची तातडीने बैठक घेतली. या बैठकीत गणेश नाईक यांनी ऐरोलीतून निवडणूक लढवावी, असा आग्रह स्वत: संदीप नाईक यांनी धरला. ऐरोलीतून संदीप यांच्याऐवजी गणेश नाईक भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्याचे निश्चित झाले. त्यानंतर नाईक यांना लगेच पक्षाचा एबी फॉर्मही देण्यात आला. त्यानुसार शुक्रवारी गणेश नाईक आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.
तत्पूर्वी नवी मुंबईतील भाजप एकसंघ आहे. त्यामुळे बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघातील भाजपचे दोन्ही उमेदवार बहुमताने विजयी होतील. त्या दृष्टीने प्रचारावर भर दिला जाईल, असे संदीप नाईक यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे संदीप नाईक यांच्यासह माजी खासदार संजीव नाईक आणि माजी महापौर सागर नाईक यांना दोन्ही मतदारसंघातील प्रचाराची धुरा संभाळावी लागणार आहे. मंदा म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज भरताना सागर नाईक उपस्थित होते. मंदा म्हात्रे यांच्या पुढील प्रचारात संदीप नाईक व संजीव नाईक सहभागी होतील का, याबाबत शहरवासीयांत उत्सुकता लागली आहे.