उरण: लोकांच्या न्याय हक्कासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असून न केलेल्या विकासकामांचे आपल्या जाहीरनाम्यातून श्रेय लाटणाऱ्या विरोधकांना त्यांची जागा दाखवणार असल्याचे परखड विचार उरणमधील शेकाप, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडीचे उमेदवार विवेक पाटील यांनी येथे व्यक्त केले.
उरण शहरातील नगरपालिका शाळेच्या मैदानात बुधवारी आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, तालुका अध्यक्ष जे. डी. जोशी, राजिप सदस्य बाजीराव परदेशी, डॉ. मनीष पाटील, नंदकुमार मुंगाजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज भगत, महिला अध्यक्षा भावना घाणेकर, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, उरण पंचायत समितीचे सभापती नरेश घरत, वैशाली पाटील, न्हावा ग्रामपंचायत सरपंच जितेंद्र म्हात्रे, शेकाप उरण तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल आदीसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
विरोधकांनी जाहीरनाम्यात शेकापने केलेली कामे आपणच केल्याचा दावा केला आहे. यामध्ये कर्नाळा अभयारण्य जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ करण्याची मागणी महेश बालदीने नव्हे तर शेकापने केली. या वेळी विवेक पाटील यांनी स्पष्ट केले. सेफ्टीझोन दोन्ही सरकार असताना का सुटला नाही? ओएनजीसीतील कंत्राटी कामगार कायम का झाले नाहीत? रसायनीतील एचओसी कंपनीच्या कामगारांचे काय झाले? जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंड वाटप करण्यासाठी भूखंड शिल्लक नाहीत. मग साडेबारा टक्के भूखंडवाटपाचा प्रश्न सुटला कसा? असे प्रश्न उपस्थित करीत विवेक पाटील यांनी विरोधकांना सुनावले. झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासाठी महाआघाडीच्या वतीने प्रयत्न केला जाणार असून यापुढे झोपडपट्टीतील नागरिक टॉवरमध्ये वास्तव करतील, असा दावाही त्यांनी केला. या वेळी वाहतूककोंडीच्या समस्येवर संघर्ष करणाºया तरुणांचेही त्यांनी अभिनंदन केले.
सभेत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत यांनी, कार्यकर्त्यांनी विवेक पाटील यांच्या प्रचारासाठी घरोघरी भेटी आणि काही मतभेद असल्यास ते दूर करण्यात येतील, असे सांगितले. या वेळी कामगार नेते भूषण पाटील, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांचीही भाषणे झाली. त्यांनीही विद्यमान आमदार मनोहर भोईर, अपक्ष उमेदवार महेश बालदी यांच्यावर जोरदार टीका केली.