पनवेल - पनवेल विधानसभा मतदार संघात सध्याच्या घडीला प्राथमिक सुविधांवरून नागरिकांनी नोटा मोहीम सुरू केली आहे. सोशल मीडियावर याचे पडसाद उमटले असून काही नागरिकांनी यासंदर्भात आवाज उठविण्याचा देखील प्रयत्न केला आहे. खारघर, कामोठे, रोडपाली आदी ठिकाणचे रहिवासी या मोहिमेत रस्त्यावर उतरले आहेत. मात्र बुधवारी (16 ऑक्टोबर) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खारघरमध्ये येणार असल्याने या नोटा अंतर्गत आंदोलन छेडणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी कोणतेही आंदोलन न करण्याची तंबी दिली आहे.
सोशल मीडियावर 'नो वर्क नो व्होट' ही मोहीम चालविणाऱ्या कळंबोली येथील दीपक सिंग यांना बुधवारी (16 ऑक्टोबर) कळंबोली पोलिसांनी दुपारी एकच्या सुमारास त्यांचे घर गाठत अटक केली. दीपक सिंग यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. आम्हाला उद्भवणाऱ्या समस्या बद्दल आम्ही काहीच बोलायचे नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे. दीपक सिंग यांच्यासह अनेक जणांना खारघर, कळंबोली पोलिसांनी भेटून कोणत्याही प्रकारचे आंदोलन न करण्याचा दम दिल्याची माहिती मिळत आहे.
पनवेल, डोंबिवली, पेण, ऐरोली, बेलापूर मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दुपारी 3.30 वाजता खारघर येथे प्रचार सभा घेणार आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत. खारघरमधील सेक्टर 29 येथील सेंट्रल पार्क जवळील भव्य मैदानात पंतप्रधान मोदींची सभा पार पडणार आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघातील प्राथमिक सुविधांवरून नागरिकांनी नोटा मोहीम सुरू केली आहे. नोटा अंतर्गत आंदोलन छेडणाऱ्या काही आंदोलकांना पोलिसांनी नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ताकीद दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण आदींसह राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री या सभेला उपस्थित राहणार आहेत. विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर, पेणचे उमेदवार रवी पाटील, ऐरोलीचे उमेदवार गणेश नाईक आणि बेलापूरच्या उमेदवार मंदा म्हात्रे या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.