नवी मुंबई : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडावी, याकरिता नवी मुंबई पोलिसांनी महिनाभर कंबर कसली होती. त्यानुसार मतदानाच्या दिवशीही सर्वत्र चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. यामुळे किरकोळ अपवाद वगळता इतर कोणताही गंभीर प्रकार शहरात न घडल्याने निर्विघ्न मतदान झाले.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून नवी मुंबई पोलिसांनी बंदोबस्ताची रंगीत तालीम केली होती. त्याकरिता आयुक्तालय कार्यक्षेत्रातील ऐरोली, बेलापूर, पनवेल व उरण या चारही विधानसभा क्षेत्रात चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. त्याकरिता नवी मुंबई पोलीस दलातील चार हजार कर्मचाऱ्यांसह ३०० हून अधिक अधिकारी, होमगार्डचे सुमारे एक हजार जवान यांच्यासह इतर राज्यातील पोलीसही बंदोबस्तावर नेमण्यात आले होते.
पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सर्व उमेदवारांच्या बैठका घेऊन प्रचारादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. यामुळे प्रचारादरम्यान टोकाची वादग्रस्त वक्तव्ये टळल्याने संभाव्य वादाचे प्रकार घडले नाहीत.
मतदानाची प्रक्रिया सुरू असताना १०० मीटरच्या हद्दीमध्ये मतदाराव्यतिरिक्त इतर अनावश्यक व्यक्तींना प्रवेशबंदी करण्यात आली होती. शिवाय मतदान केंद्राभोवती तसेच परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यांच्याकडून केंद्राभोवती जमणारा अनावश्यक जमाव वेळोवेळी पांगवला जात होता. तसेच उपआयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडूनही सर्व मतदान केंद्राला भेटी देऊन आढावा घेतला जात होता.
भरारी पथकाकडूनही दिवसभर गैरप्रकारच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात होते. मागील काही दिवसांत संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रातील सराईत गुन्हेगारांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या. यामुळे संपूर्ण मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडला नाही. मतदान केंद्रातही मतदारांच्या हालचालीवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात होते.
मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम मशिन सिलबंद करून त्या पोलीस सुरक्षेत स्ट्राँगरूममध्ये पाठवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तर मतमोजणी गुरुवारी होणार असल्याने तोपर्यंत चारही विधानसभा क्षेत्रातील स्ट्राँगरूमला पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त पुरवण्यात आला आहे.