नवी मुंबईः ऐरोली मतदारसंघात भाजपाच्या गणेश नाईक यांच्याविरोधात शिवसेना बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. तसेच दीड वाजता विजय नाहटा हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचीही शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ऐरोली मतदारसंघात गणेश नाईक यांच्यासमोर विजय नाहटांचं आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.2009मध्ये बेलापूर मतदारसंघाचे विभाजन होऊन ऐरोली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. पहिल्याच निवडणुकीमध्ये संदीप नाईक 11,957 मतांच्या फरकाने जिंकून आले. 2014च्या निवडणुकीमध्ये त्यांनी 8,725 मतांनी विजय मिळविला. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या मतदारसंघातून हॅट्ट्रिक करतील, अशी चर्चा सुरू होती. अपेक्षेप्रमाणे त्यांची उमेदवारी घोषितही झाली; परंतु शेवटच्या क्षणी गणेश नाईकांसाठी त्यांना उमेदवारी सोडावी लागली. परंतु आता गणेश नाईकांसमोरही विजय नाहटांचं आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.शिवसेनेकडून विजय नाहटा बेलापूर मतदारसंघात इच्छुक होते. त्यांनी पाच वर्षे जोरदार मोर्चेबांधणी केली होती; परंतु युतीमध्ये दोन्ही मतदारसंघ भाजपाला दिल्याने त्यांच्यासह समर्थकांची निराशा झाली आहे. नाहटा यांना राष्ट्रवादीकडूनही विचारणा झाल्याची चर्चा होती; परंतु त्यांनी हा पर्याय नाकारल्याचे बोलले जात आहे. त्यांनी शिवसेनेचे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. याविषयी लवकरच त्यांची भूमिका स्पष्ट होणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
Maharashtra Election 2019: ऐरोली मतदारसंघातून शिवसेनेची बंडखोरी, नाईकांना विजय नाहटा देणार आव्हान?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 12:14 PM