नेरुळमधील सखी मतदान केंद्र बनले मतदारांचे आकर्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 12:44 AM2019-10-22T00:44:54+5:302019-10-22T00:45:23+5:30
Maharashtra Election 2019: महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने बेलापूर विधानसभा मतदारसंघातील नेरुळ सेक्टर १८ मधील विद्याभवन शाळेतील मतदान केंद्रात सखी मतदान केंद्राची स्थापना केली होती.
नवी मुंबई : महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने बेलापूर विधानसभा मतदारसंघातील नेरुळ सेक्टर १८ मधील विद्याभवन शाळेतील मतदान केंद्रात सखी मतदान केंद्राची स्थापना केली होती. केंद्र अधिकाधिक आकर्षक करण्यासाठी फुलांची सजावट, रांगोळीच्या माध्यमातून सजावट करण्यात आली होती. मतदान केंद्रावर केलेल्या सजावटीसह सनई चौघड्यांची धून वाजविण्यात येत असल्याने केंद्र मतदारांचे आकर्षण बनले होते.
निवडणुकीत मतदार महिलांचा टक्का वाढावा, या उद्देशाने महिलांना आकर्षित करण्यासाठी निवडणूक विभागाच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सखी मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली होती. नेरुळ येथील सखी मतदान केंद्रात प्रवेश करताच सनई-चौघडाची धून आणि येणाऱ्या प्रत्येक मतदारांचे स्वागत केले जात होते.
मतदान केंद्रात ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती, तसेच मतदान केंद्रामध्ये कार्पेट टाकण्यात आले होते. सकाळी मतदानासाठी येणाºया महिलांना तुळशीचे रोप देऊन स्वागत केले जात होते. मतदान केंद्रातील सखी मतदान बूथमध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचारी महिला होत्या. या महिला कर्मचाऱ्यांनी फेटे बांधून निवडणुकीचे कामकाज केले. सखी मतदान केंद्रावर असलेल्या या सुविधांमुळे मतदान केंद्र मतदारांचे आकर्षण बनले होते.
मतदान केंद्रावर सकाळी मतदानासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिक मृदुला किसन यांचे बेलापूर विधानसभा मतदार संघ स्वीप उपक्रमाचे नोडल अधिकारी दादासाहेब चाबुकस्वार यांनी तुळशीचे रोप देऊन स्वागत केले. या मतदान केंद्रावर येणारे मतदार आवर्जून सखी मतदान केंद्राला भेट देत होते.