वैभव गायकर
पनवेल - कोल्हापुर, सांगलीमध्ये उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू आहे. या मदतीसाठी पनवेल तालुक्यातील शासकीय अधिकारी देखील धावून आले आहेत. रविवारी (11 ऑगस्ट) मदतीसाठी गोळा केलेली सामुग्री ट्रकद्वारे पनवेलमधून कोल्हापूरला रवाना करण्यात आली आहे.
कोल्हापूरकडे पाठवण्यात आलेल्या सामुग्रीमध्ये एक लाख पाण्याच्या बॉटल्स ,पाच हजार सॅनेटरी नॅपकीन, सात हजार माऊथ मास्क, फरसाण - बिस्किटे, खाद्य, कपडे आदींसह विविध जीवनावशक्यक वस्तूचा समावेश आहे. अवघ्या चार दिवसात या शासकीय अधिकाऱ्यांनी सुमारे दहा लाखांची मदत गोळा करून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे. सांगलीवरून कोल्हापूरकडे जाणारा रस्ता बंद असल्याने सुरुवातीला हे साहित्य सांगली येथे जाईल त्यानंतर मार्ग मोकळा झाल्यानंतर हे साहित्य कोल्हापूरकडे पाठविले जाणार आहे.
रविवारी सकाळी हे साहित्य ट्रकद्वारे रवाना करण्यात आले आहे. यावेळी पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, तहसीलदार अमित सानप, शहर अभियंता संजय कटेकर आदींसह महसूल, महानगर पालिका, पोलीस, परिवहन आदी विभागातील कर्मचारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कर्नाटकातील आलमट्टी धरणातून सुरू झालेला विसर्ग आणि पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांना आलेला पूर ओसरू लागला असून, मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थितीमुळे सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेल्या प्रत्येक कुटुंबास तातडीने दहा हजारांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे, तसेच पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ व 5 लीटर केरोसिन मोफत देण्यात येणार आहे. पूरस्थिती उद्भवल्यानंतर पाचव्या दिवशी सरकारी यंत्रणा जोमाने मदत कार्यास लागली.
सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थितीमुळे शाळा अथवा अन्य सुरक्षितस्थळी हलवण्यात आलेल्या प्रत्येक कुटुंबास तातडीने दहा हजारांची मदत केली जाणार आहे. त्याबाबतचा निर्णय घेत शासनाने 154 कोटींचा निधीही वर्ग केला असून, पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर तो जमा होणार आहे, अशी माहिती मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.