पाणजेसह नेरूळ, माहुल-शिवडी पक्षी अभयारण्याचा महाराष्ट्र शासनास पडला विसर!

By नारायण जाधव | Published: February 8, 2024 03:59 PM2024-02-08T15:59:12+5:302024-02-08T15:59:52+5:30

नऊ वर्षे उलटले तरी निर्णय कागदावरच : पर्यावरणप्रेमींनी मुख्यमंत्र्यांना करून दिली आठवण

Maharashtra government forgot about Nerul, Mahul-Shivadi bird sanctuary with Panja! | पाणजेसह नेरूळ, माहुल-शिवडी पक्षी अभयारण्याचा महाराष्ट्र शासनास पडला विसर!

पाणजेसह नेरूळ, माहुल-शिवडी पक्षी अभयारण्याचा महाराष्ट्र शासनास पडला विसर!

नवी मुंबई : पाणजे पाणथळ क्षेत्राच्या वादावर चर्चा करण्यासाठी पर्यावरण विभागाने सिडको, सेससोबत बैठक घेऊन १२ आठवड्यात निर्णय घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश ताजे असतानाच आता हे क्षेत्र पक्षी अभयारण्य म्हणून विकसित करण्याच्या राज्य वन्यप्राणी मंडळाने ४ डिसेंबर २०१५ आपल्या दहाव्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाचा महाराष्ट्र शासनास विसर पडला असल्याचे उघड झाले आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट केलेल्या पाणजेसह नवी मुंबईतील टीएस चाणक्य परिसर आणि मुंबईतील माहुल शिवडी परिसर असे तीन पक्षी अभयारण्यांना मान्यता दिलेल्या निर्णयाचे नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींनी स्क्रीनशॉट काढून ते विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवून या निर्णयाची आठवण करून दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर या तीन अभयारण्यांचा निर्णय बीएनएचएसने मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) साठी सुचवलेल्या शमन (mitigation) उपायांच्या अनुषंगाने घेतल्याचे म्हटले आहे.

तिन्ही पक्षी अभयारण्य कधी विकसित होणार?
मुंबई उच्च न्यायालयाने २४ जानेवारी २०२४ रोजी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांना सिडको, नवी मुंबई एकात्मिक औद्योगिक प्राधिकरण (NMIIA – पूर्वीचे नवी मुंबई सेझ) आणि पर्यावरण कार्यकर्ते नंदकुमार पवार यांची २८९ हेक्टर पाणथळ जमिनीच्या वादावर सुनावणी करण्याचे निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील नॅट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी राज्य शासनाने ९ वर्षांपूर्वी घेतलेल्या पाणजेसह नवी मुंबईतील टीएस चाणक्य परिसर आणि मुंबईतील माहुल शिवडी परिसर असे तीन पक्षी अभयारण्यांचे काय झाले, ते कधी विकसित होणार, असे प्रश्न केले आहेत. तर श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे प्रमुख नंदकुमार पवार यांनी असेही निदर्शनास आणून दिले की, नवी मुंबईतील पाणथळ जागा ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या (TCFS) सॅटेलाईट वेटलँड व्यवस्थापन योजनेचा भाग असून वनविभागाच्या मँग्रोव्ह फाउंडेशनने त्या तयार केल्याचे म्हटले आहे.

नवी मुंबई विमानतळावर ये-जा करणाऱ्या विमानांना धोका
नवी मुंबई पाणथळ जागा पक्ष्यांचे अधिवास ठिकाण म्हणून राखण्याच्या महत्त्वावर बीएनएचएसने वारंवार भर दिला आहे. पक्ष्यांना जर त्यांना त्यांची सवय असलेली ओलसर जागा दिसली नाही तर हजारोंच्या संख्येने येणारे पक्षी विमानतळ परिसरात उतरतील. त्यामुळे ये-जा करणाऱ्या विमानांना त्यांचा फटका बसून धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती बी. एन. कुमार यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Maharashtra government forgot about Nerul, Mahul-Shivadi bird sanctuary with Panja!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.