भार्इंदर : पूर्वेकडील बाळासाहेब ठाकरे मैदानात १ जानेवारीला पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत सांगलीच्या महाराष्ट्र महेंद्र केसरी नाथा पालवेने हरियाणा केसरी अशोककुमार रोहतक याच्या मानेवर घुटना डाव टाकून विजयाचा डाव साधला. मराठी मातीतल्या कुस्ती या मैदानी खेळाला शहरात सुरुवात करणाऱ्या शिवसेना उपशहरप्रमुख शंकर वीरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १ जानेवारीला नागोबा फाउंडेशन ट्रस्टने कुस्तीचे आयोजन केले होते. त्यात ८२ कुस्तीगीरांनी भाग घेतला. लहानमोठ्या ४१ कुस्त्या लढविण्यात आल्या. त्यातील महत्त्वाच्या पाच कुस्त्या मानाच्या ठरविण्यात आल्या. पहिल्या क्रमांकाची कुस्ती मुंबई महापौर केसरी रवींद्र गायकवाड विरुद्ध बनारस केसरी अरविंद कुमार यादव यांच्यात झाली. तासभर चाललेली ही कुस्ती अखेर बरोबरीत सोडविण्यात आली. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती हरियाणा केसरी अशोककुमार रोहतक विरुद्ध महाराष्ट्र महेंद्र केसरी नाथा पालवे यांच्यात झाली. सुमारे पाऊण तास चाललेल्या या कुस्तीत नाथाने रोहतकच्या मानेवर डाव्या पायाने घुटना डाव टाकून त्याला चितपट करीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे केसरी किताबासह चांदीची गदा व ५१ हजारांचे रोख पारितोषिक पटकावले. तिसऱ्या क्रमाकांची कुस्ती महराष्ट्र चॅम्पियन कुस्तीगीर संदीप काशीद व हरियाणा केसरी नारायण साई, चौथ्या क्रमांकाची कुस्ती राष्ट्रीय चॅम्पियन कुस्तीगीर उमेल अहमद व महाराष्ट्र चॅम्पियन कुस्तीगीर वसंत केचे व पाचव्या क्रमांकाची कुस्ती राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते तानाजी वीरकर व राष्ट्रीय चॅम्पियन कुस्तीगीर अच्छेलाल यादव यांच्यात झाली. हे नियोजन शिवछत्रपती पुरस्कार विजेते कुस्तीगीर नामदेव बडरे, महाराष्ट्र चॅम्पियन कुस्तीगीर श्रावण पडळकर, मारुती वीरकर यांनी केले.यावेळी शहरप्रमुख धनेश पाटील, तनुजा वीरकर, महिला उपजिल्हा संघटन स्रेहल कल्सारिया, स्थायी सभापती हरिश्चंद्र आमगावकर, नगरसेवक दळवी हे उपस्थित होते.
महाराष्ट्र केसरी नाथा विजयी
By admin | Published: January 04, 2016 2:44 AM