अर्थकारणासाठी सत्तासोपानाची लढाई, विधानसभा, मनपांसाठी भाजपची कल्याण-ठाणे मतदारसंघाच्या खांद्यावर बंदूक

By नारायण जाधव | Published: April 6, 2024 01:18 PM2024-04-06T13:18:05+5:302024-04-06T13:19:26+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: राज्यात सर्वाधिक नागरिकीकरण आणि औद्योगिकीकरण असलेला ठाणे जिल्हा आहे. सहा महापालिका, दोन नगरपालिका, दोन नगरपंचायती असलेल्या या जिल्ह्यात केंद्र, राज्य सरकार, एमएमआरडीए, महापालिकांचे अब्जावधींचे प्रकल्प सुरू आहेत.

Maharashtra Lok Sabha Election 2024: BJP's gun on the shoulder of Kalyan-Thane constituency for power battle for economy, assembly, municipalities | अर्थकारणासाठी सत्तासोपानाची लढाई, विधानसभा, मनपांसाठी भाजपची कल्याण-ठाणे मतदारसंघाच्या खांद्यावर बंदूक

अर्थकारणासाठी सत्तासोपानाची लढाई, विधानसभा, मनपांसाठी भाजपची कल्याण-ठाणे मतदारसंघाच्या खांद्यावर बंदूक

- नारायण जाधव
नवी मुंबई - राज्यात सर्वाधिक नागरिकीकरण आणि औद्योगिकीकरण असलेला ठाणे जिल्हा आहे. सहा महापालिका, दोन नगरपालिका, दोन नगरपंचायती असलेल्या या जिल्ह्यात केंद्र, राज्य सरकार, एमएमआरडीए, महापालिकांचे अब्जावधींचे प्रकल्प सुरू आहेत. असे असताना या जिल्ह्यात भाजपला शत - प्रतिशत सत्ता मिळविता आलेली नाही. लोकसभेच्या निमित्ताने ठाणे किंवा कल्याण एक मतदारसंघ भाजपला हवा आहे. हे केवळ  लोकसभेपुरते मर्यादित नाही. तर  जिल्ह्यातील १८ विधानसभा आणि सहा महापालिकांची सत्ता काबीज करण्यासाठी ताणलेली बंदूक आहे.

एकेकाळी रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांच्यासारख्या दिग्गजांनी पूर्वीच्या एकसंघ ठाणे लाेकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. नंतरच्या काळात शिवसेनेच्या आनंद दिघे यांनी कौशल्याच्या बळावर ठाण्याचा गड सर केला. मतदारसंघाच्या पुनर्रचनेत कल्याण आणि भिवंडी हे मतदारसंघ निर्माण झाले. परंतु, येथे भिवंडीवगळता दोन्हीकडे शिवसेना सरस ठरली आहे. विशेषत: ठाणे शहरात पक्षाची ताकद कमी आहे. मात्र, याच मतदारसंघातील मीरा - भाईंदर महापालिका आणि नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या बळावर भाजपची सत्ता आहे. मीरा - भाईंदर आणि नवी मुंबईत भाजपचेच आमदार आहेत. यामुळे या खेपेला ठाण्याचा खासदार भाजपचाच असावा, असा आग्रह त्या पक्षाच्या श्रेष्ठींचा आहे. 

ठाणे आणि कल्याण हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचे आहेत. त्यांचा कोपरी - पाचपाखाडी मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडतो. ठाण्यात भाजपचे संजय केळकर आमदार आहेत, तर मीरा - भाईदरमध्ये गीता जैन,  नवी मुंबईतील ऐरोलीत गणेश नाईक आणि बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे आमदार आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे, तर कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत खासदार आहेत. येथील विधानसभांमध्ये भाजपचे  वर्चस्व आहे. तरीही कल्याण - डोंबिवलीत भाजपला स्वबळावर महापालिका काबीज करता आलेली नाही.

मोठी गुंतवणूक असलेले ठाणे जिल्ह्यातील प्रकल्प
१सध्या ठाणे जिल्ह्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील १.१० लाख कोटींच्या बुलेट ट्रेन प्रकल्पासह नॅशनल हायवे ऑथारिटीचा जेएनपीटी ते दिल्लीपर्यंतचा मुंबई - दिल्ली महामार्ग, जेएनपीटी ते दिल्लीपर्यंतचा फ्रेट काॅरिडॉर हे मोठे प्रकल्प सुरू आहेत.
२ एमएमआरडीएकडून १७,७०० कोटींच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. एमएसआरडीसीचा ५५ हजार कोटींचा विरार - अलिबाग प्रकल्प  आकार घेत आहे. एमएआरडीएचे ग्रोथ सेंटर, ठाणे जिल्ह्यात नव्या एमआयडीसी आकार घेणार आहेत. समृद्धीवरील दोन ग्रोथ सेंटर ठाणे जिल्ह्यातच येणार आहेत.
३ ठाणे-कासारवडवली - भिवंडी - कल्याण - तळोजा हे मेट्रो प्रकल्प, मीरा - भाईंदर ते ठाणे मेट्रोंसह मोघरपाडा, कशेळी, मुर्धा येथे कारशेड बांधण्यात येणार आहेत. 
४ ठाणे, नवी मुंबई या दोन महापालिकांचे बजेट पाच हजार कोटींच्या घरात आहे, तर कल्याण - डोंबिली, मीरा - भाईंदर यांचे बजेट दोन ते अडीच हजार कोटींचे, भिवंडी, उल्हासनगर यांचे हजार ते दीड हजार कोटींचे बजेट आहे.
५ भिवंडीच्या गोदाम पट्ट्यात लॉजिस्टिक पार्कचे प्रकल्प येऊ घातले आहेत.
६ या पट्ट्यात कोट्यवधींची गुंतवणूक असून, याच परिसरात शापूरजी पालनजी, लोढा, रुस्तमजी, रुणवाल, पॅराडाईज, टाटा यांसारख्या विकासकांच्या टाऊनशिपही आकार घेत आहेत. यामुळे अर्थकारणासह आगामी विधानसभा आणि महापालिकांमध्ये सत्तासोपानावर चढण्यासाठी ठाणे-कल्याणची खासदारकी महत्त्वाची असल्याने महायुतीसह महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांत ते मतदारसंघ पदरात पाडण्यासाठी रस्सीखेच 
सुरू आहे. हे नुसते राजकारणच नसून अर्थकारणही आहे.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: BJP's gun on the shoulder of Kalyan-Thane constituency for power battle for economy, assembly, municipalities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.