नवी मुंबई - सोमवारी (8 जुलै) पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तुर्भे एमआयडीसी मधील बोनसरी गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गावालगतचा नाला तुंबल्याने त्यामधून वाहणारे पाणी लगतच्या रहिवाशी भागात शिरले. यामुळे तिथल्या रहिवाशांच्या स्थलांतराच्या हालचाली प्रशासनाकडून सुरु आहेत.
नवी मुंबई परिसरात सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे शहरातील नाले ओसंडून वाहत आहेत. या नाल्यांच्या मार्गात काही ठिकाणी अडथळे निर्माण झाल्याने त्यामधील पाणी रस्त्यांवरून वाहत आहे. तर काही ठिकाणी रहिवाशी भागात पाणी शिरले आहे. अशाच प्रकारातून तुर्भे एमआयडीसी येथील बोनसरी गावात सकाळपासूनच पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तिथल्या नाल्याने पाण्याची पातळी ओलांडल्याने नाल्याला नदीचे स्वरूप आले आहे. हे पाणी लगतच्या रहिवाशी भागात शिरल्याने घरांमध्ये सुमारे दोन फुटापर्यंत पाणी साचले आहे.
पावसामुळे अनेकांच्या घरातील सामान वाहून गेले आहे. तर एक घर पडल्याचा देखील प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते महेश कोठीवाले, दीपक गायकवाड यांनी ग्रामस्थांना मदतीचा हात दिला. तर संभाव्य धोका टाळण्यासाठी तातडीने जेसीबी द्वारे नाल्यातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले असल्याचे कोठीवाले यांनी सांगितले. अशातच पुढील काही तास मुसळधार पाऊस पडत राहिल्यास जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे तिथल्या रहिवाशांचं स्थलांतर करण्याच्या हालचाली प्रशासनाने चालवल्या आहेत. मात्र नाल्याची संरक्षक भिंत बांधण्याची मागणी करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने प्रतिवर्षी बोनसरी गाव जलमय होत असल्याचा संताप गायकवाड यांनी व्यक्त केला.