मयूर तांबडे
पनवेल - गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने उमरोली गावाचा संपर्क तुटला आहे. तर त्याठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या नव्या पुलाच्या बांधकामाचा पाया देखील वाहून गेला आहे. उमरोली गावाला जोडणाऱ्या स्वातंत्रपूर्व काळापासून असलेल्या पुलाच्या ठिकाणी नवा पूल उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र हा पूल यंदाच्या पावसाळ्यापूर्वी तयार होणे अपेक्षित असतानाही तसे झालेले नाही. परिणामी पूल अद्याप अर्धवट स्थितीतच आहे.
दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जुन्या पुलाच्या वरून पाणी वाहू लागले आहे. परिणामी उमरोली गावाचा मार्ग बंद झाल्याने तिथल्या सुमारे 500 कुटुंबांचा संपर्क तुटला आहे. तर नवीन पूल उभारणीसाठी तयार करण्यात आलेला पाया देखील पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला आहे. तर गावात प्रवेशाचा मार्गच बंद झाल्याने उमरोली गावातील चाकरमान्यांचेही हाल झाले आहेत. अनेकजण सकाळीच कामानिमित्ताने गावाबाहेर आले असता, ते परत घरी पोहचू शकलेले नाहीत. यामुळे पावसाळ्या पूर्वीच नव्या पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित असतानाही तसे न झाल्याने उद्भवलेल्या परिस्थितीचा संताप उमरोली गावातील रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.
बोनसरी गावात पूरसदृश्य परिस्थिती, जनजीवन विस्कळीत
सोमवारी (8 जुलै) पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तुर्भे एमआयडीसी मधील बोनसरी गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गावालगतचा नाला तुंबल्याने त्यामधून वाहणारे पाणी लगतच्या रहिवाशी भागात शिरले. यामुळे तिथल्या रहिवाशांच्या स्थलांतराच्या हालचाली प्रशासनाकडून सुरु आहेत. नवी मुंबई परिसरात सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे शहरातील नाले ओसंडून वाहत आहेत. या नाल्यांच्या मार्गात काही ठिकाणी अडथळे निर्माण झाल्याने त्यामधील पाणी रस्त्यांवरून वाहत आहे. तर काही ठिकाणी रहिवाशी भागात पाणी शिरले आहे. अशाच प्रकारातून तुर्भे एमआयडीसी येथील बोनसरी गावात सकाळपासूनच पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तिथल्या नाल्याने पाण्याची पातळी ओलांडल्याने नाल्याला नदीचे स्वरूप आले आहे. हे पाणी लगतच्या रहिवाशी भागात शिरल्याने घरांमध्ये सुमारे दोन फुटापर्यंत पाणी साचले आहे.