महाराष्ट्र राज्य लॉटरी आता ऑनलाइन देण्यासाठी चाचपणी सुरु
By कमलाकर कांबळे | Published: October 13, 2023 03:07 PM2023-10-13T15:07:26+5:302023-10-13T15:08:00+5:30
मटका व जुगाराच्या व्यसनाला प्रतिबंध घालण्यासाठी राज्याच्या वित्त विभागाने १२ एप्रिल १९६९ रोजी महाराष्ट्र राज्य लॉटरी विभागाची स्थापना केली.
नवी मुंबई : महाराष्ट्राच्या काेनाकोपऱ्यात विश्वासास पात्र ठरलेल्या महाराष्ट्र राज्य लॉटरी विभागालासुद्धा आता आधुनिकतेचे वेध लागले आहेत. पूर्वेकडील राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य लॉटरीसुद्धा आता ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. या संदर्भात संबंधित विभागाची चाचपणी सुरू असून पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या संयुक्त बैठकीत याबाबतचा प्रस्ताव राज्य लॉटरी आयुक्तांनी वित्त व लेखा विभागाला सादर केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
मटका व जुगाराच्या व्यसनाला प्रतिबंध घालण्यासाठी राज्याच्या वित्त विभागाने १२ एप्रिल १९६९ रोजी महाराष्ट्र राज्य लॉटरी विभागाची स्थापना केली.
भारतात राज्य सरकारांना लॉटरी विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने सात वर्षांपूर्वी बंदी घातली आहे. परंतु देशातील १३ राज्यांत आजही लॉटरी विक्री सुरू आहे. यात महाराष्ट्रासह केरळ, गोवा, मध्य प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, सिक्कीम, नागालॅण्ड आणि मिझोराम या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांच्या पेपर लॉटरीला महाराष्ट्र सरकारनेसुद्धा अलीकडेच मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र राज्य लॉटरी ऑनलाइन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
लॉटरी विभागाच्या उपसंचालकांचे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये कार्यालय आहे. याच कार्यालयातून प्रत्येक महिन्याला कोट्यवधी रुपये बक्षिसांच्या जवळपास ३२ सोडती काढल्या जातात.