- नामदेव मोरेनवी मुंबई : एकाच घरात विधानसभेची दोन तिकिटे देण्यास भाजपने नकार दिल्यामुळे नवी मुंबईमधील राजकीय समिकरणे बदलली आहेत. १९८५ नंतर प्रथमच गणेश नाईक यांना हक्काचा बेलापूर मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागत आहे. संदीप नाईक यांची हॅट्ट्रिकची संधी चुकली आहे. शिवसेनेच्या वाट्याला एकही मतदारसंघ आला नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, राष्ट्रवादी काँगे्रसलाही सक्षम उमदेवार शोधण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.नवी मुंबईचे राजकारण अडीच दशकांपासून गणेश नाईक व त्यांच्या परिवाराभोवती फिरत आहे. २००९ ते २०१४ या कालावधीमध्ये दोन आमदार, एक खासदार, महापौर व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ही सर्व पदे नाईक परिवारामध्येच होती; परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सर्व समिकरणे बदलू लागली. लोकसभेला प्रथम संजीव नाईकांचा पराभव झाला. नंतर विधानसभेला गणेश नाईक यांना पराभवाला सामोरे जावे लागले. महापालिका निवडणुकीमध्येही नाईक परिवारातील कोणीही निवडणूक लढवली नाही.नवी मुंबईच्या राजकारणावरील पकड ढिली होऊ लागली असल्यामुळे नाईक परिवाराने राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदारसंघ मिळतील, अशी अपेक्षा नाईक परिवारातील सदस्यांना व कार्यकर्त्यांना होती; परंतु पक्षाने बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांना तिकीट देऊन गणेश नाईक यांचा पत्ता कट केला, यामुळे त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला. दोन्ही जागा मिळाव्या यासाठी पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु भाजप पक्षश्रेष्ठी दबावाला बळी पडले नाहीत. यामुळे अखेर संदीप नाईक यांना त्यांच्या उमेदवारीची त्याग करून ऐरोलीमधून गणेश नाईक यांना उमेदवारी द्यावी लागली.भाजपच्या धक्कातंत्रामुळे नवी मुंबईमधील राजकीय समिकरणे बदलली आहेत. १९८५ पासून प्रथमच गणेश नाईक यांना पारंपरिक बेलापूर मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवारी लढवावी लागत आहे. दोन्ही मतदारसंघावरील वर्चस्व पुन्हा मिळावे, यासाठी नाईक परिवाराने भाजपमध्ये प्रवेश केला होता; परंतु त्यांना एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादीमध्ये असताना नवी मुंबईमधील सर्वाधिकार असलेल्या नेतृत्वाला स्वत:चा मतदारसंघही टिकविता आला नसल्याची खंत शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.शिवसेना पदाधिकाऱ्यांचाही भ्रमनिरास झाला असून, दोन वर्षांपासून निवडणुकीसाठी जय्यत तयारी केल्यानंतर त्यांनाही भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागणार आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे नवी मुंबईवर वर्चस्व होते. या ठिकाणी त्यांच्या पक्षाचे दोन विधानसभा सदस्य, खासदार, महापौर होता. याशिवाय दोन विधानपरिषद सदस्य येथे होते; परंतु या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला उमेदवार शोधावा लागत आहे. शिवसेनेतील बंडखोरांना गळाला लावण्याचे प्रयत्नही राष्ट्रवादीकडून बुधवारपर्यंत सुरू होते.विद्यमान आमदार निवडणूक रिंगणाबाहेर२००९ मध्ये बेलापूर मतदारसंघाचे विभाजन होऊन ऐरोली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. पहिल्याच निवडणुकीमध्ये संदीप नाईक ११,९५७ मतांच्या फरकाने जिंकून आले. २०१४ च्या निवडणुकीमध्ये त्यांनी ८,७२५ मतांनी विजय मिळविला. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या मतदारसंघातून हॅट्ट्रिक करतील, अशी चर्चा सुरू होती. उमेदवारीसाठी स्पर्धा बेलापूर मतदारसंघामध्ये सुरू होती. अपेक्षेप्रमाणे त्यांची उमेदवारी घोषितही झाली; परंतु शेवटच्या क्षणी गणेश नाईकांसाठी त्यांना उमेदवारी सोडावी लागली आहे.बेलापूरची उमेदवारी पुन्हा मंदा म्हात्रेंनाचबेलापूर मतदारसंघामध्ये २०१४ च्या निवडणुकीमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांचा पराभव केला होता. २०१९ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांनीच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे म्हात्रे यांना उमेदवारी मिळणार का? याविषयी शंका उपस्थित केली जात होती. शेवटच्या क्षणी पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखविल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. आतापर्यंत म्हात्रे यांना विरोध करणाºया नाईक समर्थकांना व शिवसेना पदाधिकाºयांनाही त्यांचा प्रचार करावा लागणार आहे.विजय नाहटांची भूमिका गुलदस्त्यातशिवसेनेकडून विजय नाहटा बेलापूर मतदारसंघात इच्छुक होते. त्यांनी पाच वर्षे जोदार मोर्चेबांधणी केली होती; परंतु युतीमध्ये दोन्ही मतदारसंघ भाजपला दिल्याने त्यांच्यासह समर्थकांची निराशा झाली आहे. नाहटा यांना राष्ट्रवादीकडूनही विचारणा झाल्याची चर्चा होती; परंतु त्यांनी हा पर्याय नाकारल्याचे बोलले जात आहे. त्यांनी शिवसेनेचे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यर्त्यांनी केली आहे. याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांना विचारणा केली असता गुरुवारी भूमिका स्पष्ट करू असे त्यांनी स्पष्ट केले आहे.नाईक समर्थकांना मोठा धक्कानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अनेक आजी व माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला; परंतु यामध्ये सर्वात भव्य सोहळा झाला तो गणेश नाईकांच्या प्रवेशाचा. ४८ नगरसेवकांसह गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी संदीप नाईक व सागर नाईक यांनी प्रवेश केला होता. भाजपमध्ये गेल्याने नवी मुंबईमधील राजकीय वर्चस्व पुन्हा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटत होता; परंतु फक्त एकच मतदारसंघात उमेदवारी मिळाल्याने समर्थकांना मोठा धक्का बसला आहे.
Vidhan sabha 2019 : नवी मुंबईमधील समिकरणे बदलली, नाईक परिवाराला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 3:20 AM