Vidhan Sabha 2019 : सोशल मीडियावर इच्छुकांचा बोलबाला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 02:54 AM2019-09-30T02:54:54+5:302019-09-30T02:55:24+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही प्रमुख पक्षाने अद्यापि आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली नाहीत, त्यामुळे कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवी मुंबई : ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही प्रमुख पक्षाने अद्यापि आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली नाहीत, त्यामुळे कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असले तरी भाजप आणि शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रचाराचा धडाका सुरू केला आहे.
बेलापूर विधानसभा क्षेत्रातून भाजपमधून विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह अलीकडेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नावाची चर्चा आहे. दोघांपैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, हे पुढील एक-दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे. असे असले तरी दोन्ही नेत्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी आतापासूनच सोशल मीडियावर प्रचाराचा धडाका सुरू केला आहे.
व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम तसेच फेसबुकवर या नेत्यांच्या प्रचाराचा सध्या मोठा बोलबाला पाहावयास मिळतो. बेलापूरमधून शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा हे इच्छुक आहेत, त्यानुसार त्यांनी मागील तीन वर्षांपासून मतदारसंघात विविध कार्यक्रमांचा धडाका सुरू केला आहे. विशेष म्हणजे, युतीबाबत अद्यापि निर्णय झालेला नाही. उमेदवारी भरण्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात युतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून संभ्रमात टाकणारी विधाने केली जात आहेत. तर रविवारी शिवसेनेने काही ठिकाणची उमेदवारी जाहीर करीत उमेदवारी फॉर्मचेही वाटप केले आहे.
‘बेलापूर’वरून तर्क-वितर्क
युती झाल्यास बेलापूरची जागा भाजपकडेच राहणार हे निश्चित मानले जात आहे. नाहटा यांनी येथून जोरदार तयारी सुरू केल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाहटा यांच्या समर्थनार्थ सध्या आमचे ठरलेय आता अशा स्वरूपाच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यामुळे युतीच्या चर्चेत बेलापूर नक्की कोणाच्या वाट्याला जाईल, याबाबत शहरवासीयांत तर्क-वितर्क सुरू आहेत.