Vidhan Sabha 2019 : बेलापूर विधानसभा शिवसेना लढणार- आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 05:50 AM2019-09-17T05:50:49+5:302019-09-17T05:51:40+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- शिवसेना बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी वाशीत दिले.

Maharashtra Vidhan Sabha 2019 Shiv Sena to contest Belapur assembly: Aditya Thackeray | Vidhan Sabha 2019 : बेलापूर विधानसभा शिवसेना लढणार- आदित्य ठाकरे

Vidhan Sabha 2019 : बेलापूर विधानसभा शिवसेना लढणार- आदित्य ठाकरे

Next

नवी मुंबई /अलिबाग : शिवसेना बेलापूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी वाशीत दिले. आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे सोमवारी नवी मुंबईत आगमन झाले. त्यानंतर वाशीत झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी विधानसभा निवडणुकीनंतर बेलापूर मतदार संघात विजयी मेळाव्यासाठी आपण पुन्हा येणार असल्याचे सूचक वक्तव्य केल्याने सेना बेलापूरमधून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे आमदार आहेत, तर अलीकडेच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपत दाखल झालेले माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे. दुसरीकडे शिवसेनेतून विजय नाहटा यांनीही बेलापूरमधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. असे असले तरीही ही जागा भाजपच्याच वाट्याला जाईल असे अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहेत. अशातच आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे बेलापूरची जागा शिवसेना लढणार असल्याचे संकेत दिल्याने राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जनआशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या दिवसातला चौथा टप्पा नवी मुंबईत झाला. त्यानुसार बेलापूर येथे या यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर बेलापूर, नेरुळ, सानपाडा येथून ऐरोली येथील जनतेशी आदित्य यांनी संपर्क साधला.
दरम्यान, शिवसेनेची जन आशीर्वाद यात्रा तळ कोकणानंतर सोमवारी अलिबागमध्ये दाखल झाली. अलिबाग येथील माळी समाज सभागृहात आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
लोकसभा निवडणुकीत ज्यांनी शिवसेनेला मदत केली आणि ज्यांनी केली नाही अशा सर्वांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. नव्या महाराष्ट्राचे, भगव्या महाराष्ट्राचे स्वप्न स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आहे. ते स्वप्न पूर्ण करण्याचे काम उद्धव ठाकरे, मी आणि तमाम शिवसेना करत आहे. यासाठी जनतेचे आशीर्वाद गरजेचे आहेत. बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र, प्रदूषणमुक्त महाराष्ट्र, कर्जमुक्त महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र आणि सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवण्यासाठी शिवसेनेचे हात बळकट करा, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
निवडणुका जिंकण्याची अथवा हरण्याची चिंता कधीच बाळगली नाही. सत्तेमध्ये असतानाही शिवसेनेने जनतेसाठी संघर्ष केला आहे. शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले मात्र विम्याचे पैसे देण्याची वेळ आली तेव्हा विमा कंपन्यांनी पळ काढला होता. शेतकºयांचे पैसे ओरबाडणाºया धडा शिकवण्याचा एल्गार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यासाठी मुंबईमध्ये मोर्चा काढला. सेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे राज्यातील १० लाख शेतकºयांना विम्याची रक्कम मिळाली. ही शिवसेनेची ताकद असल्याची आठवण त्यांनी करुन दिली.याप्रसंगी सचिन अहिर यांच्यासह अन्य स्थानिक नेत्यांनी मार्गदर्शन केले.
>खड्ड्यांचा त्रास सर्वांनाच
मुंबईतील खड्ड्यांबाबत सेलिब्रिटींनी आवाज उठविल्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, राज्यातील बहुतांश रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहे. सेलिब्रिटींनाच त्रास होतो असे नाही, तर सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सरकार याची दखल घेऊन लवकरच रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेईल.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Shiv Sena to contest Belapur assembly: Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.