Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 07:34 PM2024-10-21T19:34:33+5:302024-10-21T19:52:11+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काल भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ऐरोलीतून गणेश नाईक यांची उमेदवारी जाहीर केली.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून आता उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात झाली, काल भाजपाने पहिली ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत ऐरोलीतून गणेश नाईक यांना उमेदवारी दिली, तर बेलापूर विधानसभेतून आमदार मंदा म्हात्रे यांचे नाव आहे. बेलापूरमधून गणेश नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक यांनी उमेदवारीची मागणी केली होती. दरम्यान, आता संदीप नाईक बंडखोरी करणार असल्याचे बोलले जात आहे.
संदीप नाईक बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे आता ते बंडखोरी करुन निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता संदीप नाईक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
दरम्यान, भाजपाच्या गणेश नाईक यांनी आज प्रचाराला सुरुवात केली. आज त्यांनी संदीप नाईक यांच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया दिली . गणेश नाईक म्हणाले, लोकशाही आपण कोणाचा आवाज दाबू शकत नाही. एखाद्या कार्यकर्त्याला वाटलं तर त्याने ते बोलून काही चूक केली असं मला वाटत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. मला दुसऱ्यांदा उमेदवारी दिली. माझ्यावर वरिष्ठ नेत्यांनी विश्वास ठेवला.
"मी संदीप नाईक यांचा वडील आहे, पक्षाच्या निरिक्षकांनी मतदारसंघातील वातावरण बघून निर्णय घेतला असे. संदीप नाईक त्या कॅलिबरचे नाहीत असं वाटलं असेल आणि पक्षाला जे वाटलं असेल ते बरोबर असं आपण म्हणायला पाहिजे, असंही गणेश नाईक म्हणाले. संदीप नाईक यांनी पक्षाच्या शिस्तसोबत चालले पाहिजे. पण त्यांना जर त्यांच्यात लढण्याचा उत्साह असेल तर मी थांबवणार नाही,मी त्यांना पक्षासोबत थांबून काम केलं पाहिजे असंच सांगेन, असंही गणेश नाईक म्हणाले.