Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बेलापूरमध्ये अटीतटीच्या लढतीत मंदा म्हात्रें विजय; पिपाणीने बिघडविले तुतारीचे समीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 09:35 AM2024-11-24T09:35:39+5:302024-11-24T09:36:28+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: २०१४ च्या विजयाची पुनरावृत्ती झाली. त्या निवडणुकीमध्येही शेवटच्या फेरीमध्ये मंदा म्हात्रे यांनी १४९१ मतांनी विजय मिळविला होता.
नामदेव मोरे
नवी मंंबई : बेलापूरमध्ये शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत चुरशीची लढाई झाली. अटीतटीच्या लढतीमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी ३७७ मतांनी विजय मिळविला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप नाईक यांना नामसाधर्म्य असलेला उमेदवार, बंडखोर व पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराचा फटका बसून तुतारीच्या विजयाची गणिते बिघडली.
चुरशीच्या लढतीमध्ये बेलापूरचा समावेश आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून १५ फेऱ्यांमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी आघाडी घेतली होती. १६ व्या फेरीपासून २६ व्या फेरीपर्यंत संदीप नाईक यांनी आघाडी घेतली व अखेरच्या दोन फेऱ्यांमध्ये पुन्हा मंदा म्हात्रे यांनी आघाडी घेऊन बाजी मारली. २०१४ च्या विजयाची पुनरावृत्ती झाली. त्या निवडणुकीमध्येही शेवटच्या फेरीमध्ये मंदा म्हात्रे यांनी १४९१ मतांनी विजय मिळविला होता.
विजयाची कारणे
१) दहा वर्षांतील विकासकामांमुळे विश्वास जिंकण्यात यशस्वी
२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोर विजय नाहटा यांना साथ न देण्याचे केलेले आवाहन
३) लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या मतदानाचा लाभ
पराभवाची कारणे
१) वडील एका पक्षात व मुलगा एका पक्षात हे अनेक मतदारांना रुचले नाही.
२) राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार मंगेश आमले यांनी २,३३३ मते घेतली.
३) उशिरा उमेदवारीमुळे मतदारांपर्यंत भूमिका पोहोचविण्यात अपयश.