ठाणे - जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे. कौस्तुभ राणे असे या शहीद जवानाचे नाव असून ते नवी मुंबईतील शितल नगर येथे राहात होते. भारतीय सैन्याच्या 36 रायफल बटालियनमध्ये ते मेजर म्हणून कार्यरत होते. आज सकाळी दहशतवाद्यांशी लढताना या भूमिपुत्राने देशासाठी बलिदान दिले. या वृत्ताने मुंबईसह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
जम्मू-काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांकडून मोठा घातपात घडवण्याचा कट रचला जात होता. मात्र, भारतीय सैन्यातील सतर्क जवानांनी घुसखोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या या दहशतवाद्यांचा डाव हाणून पाडला. दहशतवादविरोधी कारवाई करताना जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र, या चकमकीत चार जवानांना वीरमरण आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे हे शहीद झाले आहेत. राणे हे मीरा रोडमधील शितल नगर येथे राहत होते. अवघ्या 34 व्या वर्षी राणे यांनी देशासाठी आपले बलिदान दिले. राणेंसह रायफलमन मनदीपसिंग रावत, रायफलमन हमीर सिंग आणि गुनर विक्रमजीत सिंग यांनाही वीरमरण आले. राणे यांच्या निधनानंतर मुंबईसह महाराष्ट्रात शोककळी पसरली असून त्यांना सोशल मीडियातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.