"महाविकास आघाडीचे सरकार हप्ते घेणारे", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बोचरी टीका

By योगेश पिंगळे | Published: October 11, 2024 05:49 PM2024-10-11T17:49:20+5:302024-10-11T18:21:06+5:30

Eknath Shinde News: तुम्ही कोविड मधल्या खिचडीत, डेडबॉडीच्या बॅगमध्ये, कोविड सेंटरमध्ये, चारा घोटाळ्यात, शेण घोटाळ्यात, कोळशात पैसे खाल्ले त्यामुळे तुम्हाला भ्रष्ट्राचारावर बोलण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी महाविकास आघाडी सरकारला केला.

"Mahavikas Aghadi government taking installments", Chief Minister Eknash Shinde's criticism | "महाविकास आघाडीचे सरकार हप्ते घेणारे", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बोचरी टीका

"महाविकास आघाडीचे सरकार हप्ते घेणारे", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बोचरी टीका

- योगेश पिंगळे

नवी मुंबई - तुम्ही कोविड मधल्या खिचडीत, डेडबॉडीच्या बॅगमध्ये, कोविड सेंटरमध्ये, चारा घोटाळ्यात, शेण घोटाळ्यात, कोळशात पैसे खाल्ले त्यामुळे तुम्हाला भ्रष्ट्राचारावर बोलण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी महाविकास आघाडी सरकारला केला. वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात शुक्रवारी सिडको आणि महापालिकेच्या विविध कामांचे उद्घाटन, भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

आमचं सरकार स्वच्छ असून, आम्ही काही झाकून ठेवत नाही. आम्ही जे करतो त्या या जनतेसाठी करतो. यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, त्यांना पोटदुखी झाली आहे. म्हणून या सर्व योजना बंद पाडाव्यात यासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रत्येक ठिकाणी आडवं लावण्याचा प्रयत्न करण्याचा हे लोक करीत आहेत, परंतु लोकांनी आता तुम्हाला आडवं करण्याचा निश्चय केला असल्याचे शिंदे म्हणाले. सिडकोच्या माध्यमातून वाशी येथील महाराष्ट्र भवनचे भूमिपूजन, नैना नगर रचना परियोजनांतर्गत विकासकामे, ठाणे पुनरुत्थान योजना, २६ हजार ६७५ सदनिकांच्या महागृहनिर्माण योजनाचा प्रारंभ, आंतरराष्ट्रीय खारघर व्हॅली गोल्फ कोर्स, सेंट्रल एक्सलन्स येथील प्रेक्षक गॅलरी, ईर्शाळवाडीतील नागरिकांना घराच्या चाव्यांचे वाटपासह नवी मुंबई महापालिका रुग्णालयात कॅन्सर रुग्णांसाठी केमोथेरेपी सुविधेचा प्रारंभ, पाणीपुरवठा, पर्यावरण, घनकचरा व्यवस्थापन, विविध पायाभूत सुविधांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, श्रीरंग बारणे, सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, आमदार गणेश नाईक, मंदा म्हात्रे, निरंजन डावखरे, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल उपस्थित होते.

अन्यथा एकही अधिकारी मी जागेवर ठेवणार नाही
हे गोरगरिबांचे सरकार आहे. अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांचा विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे, अन्यथा एकही अधिकारी मी जागेवर ठेवणार नाही असा सज्जड दम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिला. हे सरकार लोकांना देणारे आहे, त्यामुळे कायदे, नियम लोकांच्या भल्यासाठी पाहिजेत..

मुख्यमंत्री सुरक्षित बहीण योजना
राज्यातील प्रत्येक महिला सुरक्षित असली पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणे मुख्यमंत्री सुरक्षित बहीण योजनादेखील सुरू केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Web Title: "Mahavikas Aghadi government taking installments", Chief Minister Eknash Shinde's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.