सिकंदर अनवारे, दासगांवमार्च महिन्यापूर्वी सर्वच विभागाकडून मोठ्या प्रमाणात करवसुली करण्याकरिता कारवाया केल्या जातात त्याप्रमाणे महावितरणने देखील कारवाईस प्रारंभ केला आहे. यात सर्वात आधी ग्रामीण भागात होत असलेल्या पाणीपुरवठा योजनांवरच महावितरणने टाच मारली असून तालुक्यातील जवळपास ४३ पाणीपुरवठा योजनांची वीज जोडणी तोडली. परिणामी पाणीपुरवठा ठप्प झाल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. थकबाकीमध्ये महाड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांना करण्यात आलेल्या वीज जोडणींची कोटीची थकबाकी असल्याने वरिष्ठांच्या आदेशाने कारवाई होत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.विजेच्या अनेक तक्रारी असल्यातरी महावितरण याबाबत धडक निर्णय घेत नसली तरी वीज बिल थकीत कारवाईबाबत महावितरणने कधीच कुचराई केलेली नाही. महावितरणने महाड तालुक्यातील जवळपास ४३ ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा तोडला आहे. यामुळे ग्रामपंचायतीमधील पाणीपुरवठा देखील ठप्प झाला आहे. तालुक्यात एकूण २२४ पाणीपुरवठा जोडणीधारक आहेत. यापैकी १४४ ग्राहक थकबाकीदार आहेत. महावितरणने कारवाईस प्रारंभ केल्यानंतर १४४ पैकी ४३ वीज जोडण्या तोडल्या आहेत. तर १०१ वीज जोडण्या येत्या १० तारखेपर्यंत तोडण्यात येणार आहेत. या थकबाकीदार ग्रामपंचायतीमध्ये तालुक्यातील दासगाव, लाडवली, तुडील तर्फे नरवण, केंबुर्ली, खरवली, वाळण, नांदगाव बु., करंजखोल, शेल, कांबळे तर्फे महाड, नडगाव, काळकाई कोंड, वडघर, नडगाव, विन्हेरे बागवाडी, चिंभावे, आकले या ग्रामपंचायतींची लाखापेक्षा अधिक थकबाकी राहिली आहे. महाडमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची जवळपास १ कोटी ४१ लाखांची थकबाकी झाली आहे. या थकबाकीची वसुली येत्या मार्चपूर्वी करण्यात येणारअसल्याने ग्रामपंचायतींवर ही कारवाई केली असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.थकबाकीदार ग्रामपंचायतींमध्ये दासगाव ग्रामपंचायतीची १८ लाख ८७ हजार रुपये, लाडवली ९ लाख ७७ हजार, तुडीलतर्फे नरवण १२ लाख ३० हजार, कांबळे तर्फे महाड ७ लाख ५५ हजार, नडगाव ७ लाख ४७ हजार, करंजखोल ५ लाख ६१ हजार तरअन्य ग्रामपंचायतींची दोन ते तीन लाखांच्या आसपास थकबाकी आहे.
महाडमध्ये महावितरणची वसुली सुरू
By admin | Published: February 05, 2016 2:55 AM