महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के म्हणतात- गणेश नाईक मोठ्या मनाचे; त्यांच्यामुळेच विजयाची खात्री!
By कमलाकर कांबळे | Updated: May 11, 2024 20:00 IST2024-05-11T19:59:35+5:302024-05-11T20:00:42+5:30
भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात गणेश नाईकांनी केले म्हस्के यांच्या विजयाचे आवाहन

महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के म्हणतात- गणेश नाईक मोठ्या मनाचे; त्यांच्यामुळेच विजयाची खात्री!
कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. देशाचा विकास हे मोदींचे स्वप्न आहे. या स्वप्नपूर्ततेसाठी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना विक्रमी मताधिक्क्याने निवडून द्या, असे आवाहन आमदार गणेश नाईक यांनी शनिवारी केले. नवी मुंबई भाजपा जिल्हा कमिटीने आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्केसुद्धा उपस्थित होते. गणेश नाईक यांच्या नेतृत्वामुळे सुनियोजित नवी मुंबई शहर घडल्याचा गौरव नरेश म्हस्के यांनी आपल्या भाषणात केला. ते मोठ्या मनाचे असून, त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविताना मला विजयाची खात्री वाटते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीची प्रस्तावना नवी मुंबई, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केली. २०१९ पासून नवी मुंबईमध्ये भाजप संघटन अधिक मजबूत झाले. २०० पेक्षा जास्त कार्यक्रम झाल्याचे जिल्हाध्यक्ष नाईक यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नरेश म्हस्के यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी महापौर तथा ऐरोली विधानसभा निवडणूक प्रमुख सागर नाईक, आमदार रवींद्र फाटक, भाजप माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, युवा नेते वैभव नाईक, बेलापूर विधानसभा निवडणूक प्रमुख नीलेश म्हात्रे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापिका वर्षा भोसले यांच्यासह नवी मुंबई भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.