नवी मुंबई : स्वच्छता अभियानानिमित्ताने नवी मुंबई पालिकेने सानपाडा उड्डाणपुलाखालील कचरा साफ करून तेथे क्रीडा संकुल तयार केले आहे. या क्रीडा संकुलाचे व्हिडीओ देशभर व्हायरल झाले आहेत. महापालिकेच्या या कल्पकतेची दखल उद्योजक आनंद महिंद्रा यांनीही घेतली असून, पुलाखालील क्रीडासंकुलाचा व्हिडीओ ट्वीट करून ‘चला प्रत्येक शहरात अशा प्रकारे परिवर्तन करू या’ अशा शब्दांत कौतुक केले आहे.
पुलाखालील कचऱ्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महानगरपालिकेने त्या ठिकाणी २,७४५ चौरस मीटर जागेवर क्रीडा संकुल तयार करण्याचा निर्णय घेतला. जास्त उंची असलेल्या ठिकाणी बास्केटबॉल कोर्ट व बॅडमिंटनची ३ कोर्ट तयार करण्यात आली. २२ यार्डचे पीच असलेला बॉक्स क्रिकेटचा झोन तयार केला. ३०.६१ बाय १४ मीटर आकाराची स्केटिंग रिंग तयार करण्यात आली.
एका तरुणाने या क्रीडा संकुलाचा व्हिडीओ तयार करून ‘तुमच्या शहरात असे क्रीडा संकुल आहे का,’ असा प्रश्न उपस्थित केला . हाच व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करून प्रत्येक शहरात अशा प्रकारे परिवर्तन झाले पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. दरम्यान, मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आणखी दोन पुलांखाली असेच क्रीडा संकुल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
सानपाडा पुलाखालील क्रीडा संकुलाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे व सीवूडमधील पुलाखालीही क्रीडा संकुल विकसित करण्यात येणार आहे. - संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महानगरपालिका
स्वच्छता अभियानाअंतर्गत सानपाडा पुलाखाली क्रीडा संकुल तयार करण्यात आले आहे. या क्रीडा संकुलाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. शहर स्वच्छतेसाठी आवश्यक त्या ठिकाणी योग्य त्या प्रकारे सुशोभीकरणाची कामे करण्यास प्राधान्य दिले जात आहे. - राजेश नार्वेकर, आयुक्त महानगरपालिका