कोकण विभागात'महसूल दूत’ उपक्रम
By कमलाकर कांबळे | Published: August 2, 2023 03:02 PM2023-08-02T15:02:08+5:302023-08-02T15:02:33+5:30
कोकण विभागातील प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी ‘महसूल दूत’ नेमण्यात आले आहेत.
कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: महसूल सप्ताहात शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना शासकीय योजनांकरिता आवश्यक असणारी कागदपत्रे, दाखले आणि इतर महत्त्वाच्या सेवा-सुविधांचा लाभ सहजरित्या मिळावा. महसूल संबंधित दाखले व इतर बाबी मिळविण्यासाठी विनाकारण खर्च होणारा वेळ व पैशांची बचत व्हावी,या उद्देशाने विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून कोकण विभागातील प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी ‘महसूल दूत’ नेमण्यात आले आहेत.
राज्यभरात १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह कोकण विभागात विविध कार्यक्रमांच्या आयोजनासह मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. महसूल सप्ताहामध्ये कोकण विभागातील प्रत्येक जिल्ह्यात सात-बाऱ्यावर महिलांचे नाव लावणे, कातकरी उत्थान कार्यक्रमाअंतर्गत दाखल्यांचे वाटप करणे, महसूल संबंधित विविध योजनांमधील लाभार्थ्यांना दाखले वाटप करणे, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करणे, युवासंवाद कार्यक्रमाअंतर्गत स्पर्धा परीक्षेसाठी स्पर्धा परीक्षा केंद्रांवर कार्यक्रम घेणे ही सर्व कामे सुलभरित्या व्हावी, सामान्य नागरिकांना, विद्यार्थ्यांना तसेच वयोवृध्दांना या सेवेचा लाभ घेताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये, त्यांच्या वेळेची व पैशांची बचत व्हावी यासाठी विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी कोकण विभागातील प्रत्येक जिल्हा व तालुकास्तरावर ‘महसूल दूत’ नेमण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली असून, कोकण विभागातील सर्व जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी महसूल दूतांची नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल दूतांच्या दैनंदिन कामकाजाचा आयुक्त स्वत: आढावा घेत आहेत.
महसूल सप्ताहात कोकण विभागातील नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिलेल्या महसूल दूतांच्या सेवेचा विभागातील शेतकरी, विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी, माजी सैनिक, वयोवृध्द अशा सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.