- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली - नवीन पनवेलहून खांदा वसाहतीत येणाऱ्या मुख्य पावसाळी नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढलेली आहेत. त्यात कचराही साचलेला आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदा या नाल्याची सफाई होताना दिसत नाहीत. त्यामुळे तातडीने या संदर्भात कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक नगरसेविका सीता पाटील यांनी सिडकोकडे केली आहे.खांदा कॉलनीतून तीन मुख्य पावसाळी नाले जातात. एक नवीन पनवेल येथून थेट कामोठा खाडीला जोडणारा नाला आहे. हा नाला नवीन पनवेलसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आसुडगाव आणि खांदा कॉलनीमधून जाणाºया नाल्याची मान्सूनपूर्व साफसफाई करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी अडथळे निर्माण होतील. त्यामुळे या परिसरातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. बालभारती जवळील दोन्ही बाजूकडील नाले महत्त्वाचे आहेत. नवीन पनवेल परिसरातील पावसाचे पाणी याच नाल्यांमधून खाडीला जाऊन मिळते; परंतु या नाल्यांचीही अवस्था बिकट झाली आहे. मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढलेली आहेत, तर काही ठिकाणी नागरी कचराही साचलेला आहे. मे महिना सुरू झाला तरी सिडकोकडून हे मुख्य नाले साफ करण्याबाबत हालचाली दिसून येत नाहीत. म्हणून नगरसेविका सीता पाटील यांनी या बाबत सिडकोला पत्र दिले आहे. या संदर्भात त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.आठवडाभरात नवीन पनवेल आणि खांदा कॉलनीतील नालेसफाईला सुरुवात करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने काम एजन्सीला देण्याची प्रक्रिया चालू आहे. हे काम वेळेत पूर्ण होईल या दृष्टीने प्रयत्न केले जातील.- व्ही. एल. कांबळी, कार्यकारी अभियंता, सिडको, नवीन पनवेल
खांदा वसाहतीतील मुख्य नालेही सफाईच्या प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 2:53 AM