सूर्यकांत वाघमारे / नवी मुंबईहळदीच्या अनावश्यक खर्चावरून ज्येष्ठ आणि तरुण यांच्यात विचारांची दुफळी निर्माण झाली आहे. अनावश्यक खर्च टाळून पारंपरिक पध्दतीनेच समारंभ करण्याच्या ग्रामस्थ मंडळांच्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही. शिवाय तरुणांचे विचार आक्रमक असल्यामुळे ज्येष्ठांकडून आक्षेप घेतला जात आहे.हळदी समारंभात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या डीजेमुळे वाद उद्भवून पोलिसांनी लाठीहल्ला केल्याचा प्रकार गुरुवारी पहाटे कोपरखैरणेत घडला. या प्रकारामुळे रात्री उशिरापर्यंत चालणारे समारंभ वादात सापडले आहेत. याचा सर्वाधिक परिणाम आगरी कोळी समाजाच्या होणाऱ्या हळदी समारंभावर होणार आहे. त्यावर सखोल चर्चेसाठी शनिवारी रात्री कोपरखैरणेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३०० हून अधिक ग्रामस्थ व तरुण बैठकीला उपस्थित होते. मात्र ज्येष्ठ व तरुणांमध्ये वैचारिक दुमत असल्याचे दिसुन आले. विविध समारंभाच्या माध्यमातून होणाऱ्या अनावश्यक खर्चाला ज्येष्ठांचा विरोध आहे. त्याकरिता हळदीवर होणारा अनावश्यक खर्च टाळण्याबाबत सखोल चर्चेसाठी शनिवारी रात्री कोपरखैरणेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला आमदार संदीप नाईक, आमदार मंदा म्हात्रे, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, नगरसेवक शिवराम पाटील, द्वारकानाथ भोईर, ज्येष्ठ ग्रामस्थ दशरथ पाटील, भाजपा जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, ज्येष्ठ माजी नगरसेवक केशव म्हात्रे, आगरी कोळी युथ फाउंडेशन अध्यक्ष नीलेश पाटील, युवा नेते वैभव नाईक आदी उपस्थित होते. यावेळी नीलेश पाटील यांनी घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत मोर्चा काढण्याची गरज व्यक्त केली. परंतु आमदार मंदा म्हात्रे यांनी आगरी कोळी समाजाने चुकीच्या मार्गाने वाहत न जाता काळाप्रमाणे बदलण्याचे आवाहन केले. तसेच अनावश्यक खर्च टाळण्यात स्वत:हून पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचेही त्या म्हणाल्या. तर आमदार संदीप नाईक यांनी देखील रात्री उशिरापर्यंत समारंभ सुरू न ठेवता सर्वांनीच कायद्याचे पालन करण्याची गरज व्यक्त केली. त्याशिवाय इतरही ज्येष्ठांनी वेळेतच लग्न व हळदी समारंभ उरकून रात्री १२ च्या आत नवरदेव घरात आला पाहिजे, अशी सूचना केली. मात्र ज्येष्ठांच्या भूमिकेला तरुणांकडून आव्हान देत हळदीत रात्रभर डीजे वाजणारच असा सोशल मीडियावर त्यांचा सूर आहे.
आगरी-कोळी समाजापुढे बदलाचे मोठे आव्हान
By admin | Published: April 24, 2017 2:39 AM