हॉलिडे पॅकेजच्या बहाण्याने घातला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 12:01 AM2019-04-17T00:01:01+5:302019-04-17T00:01:08+5:30
जगभरात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी स्वस्तातील हॉलिडे पॅकेजचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे.
नवी मुंबई : जगभरात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी स्वस्तातील हॉलिडे पॅकेजचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी सेमिस्टर ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीविरोधात सीबीडी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप पर्यंत १५ जणांची सुमारे १४ लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेक जण देश-विदेशात पर्यटनासाठी जातात. मात्र, अनेकांना आर्थिक परिस्थितीवरून जगभ्रमंतीचा मोह आवरता घ्यावा लागतो. याच संधीचा फायदा घेऊन त्यांना स्वस्तात जगभ्रमंतीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळ्या राज्यभर सक्रिय आहेत. त्यांच्याकडून आलिशान इमारतीमध्ये कार्यालय थाटून त्या ठिकाणी सेमिनारच्या नावाखाली अनेकांना बोलवून पर्यटनाची भुरळ घातली जात आहे. अशाच प्रकारातून १५ जणांना १३ लाख ७१ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार सीबीडी बेलापूर येथे घडला आहे. या प्रकरणी १५ जणांच्या तक्रारीवरून सेमिस्टर ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीविरोधात सीबीडी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व तक्रारदारांना फोन अथवा मॅसेज करून सेक्टर १५ येथील एनएमएस टिटानियम इमारतीच्या आठव्या मजल्यावरील सेमिस्टर ग्लोबल कंपनीच्या कार्यालयात बोलवण्यात आले होते. त्यांना वेगवेगळी हॉलिडे पॅकेजची माहिती देऊन ते खरेदी केल्यास ३० वर्षांत जगभरात मोफत सात ते दहा दिवस राहायला मिळणार असल्याचे सांगितले होते.
यावरून सर्व तक्रारदारांनी ८० हजार रुपये ते १ लाख २० हजार रुपयांपर्यंतचे पॅकेज खरेदी केले होते. त्याची रक्कम अदा केल्यानंतर कंपनीकडून फोन येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, आठवडाभर वाट पाहूनही कंपनीतर्फे कोणीच संपर्क न साधल्याने त्यांनी सीबीडी येथील कार्यालयाकडे धाव घेतली असता, त्या ठिकाणी कोणीच नव्हते, यामुळे सेमिस्टर ग्लोबल कंपनीकडून फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सीबीडी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार मॅनेजर विक्रांत मनदास व इतर कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
>सेमिस्टर ग्लोबल सर्व्हिसेस कपंनीचे मॅनेजर विक्रांत मनदास व इतर कर्मचाºयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची नावेही बनावट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीही वाशी व सानपाडा, पनवेल परिसरात अशी कार्यालये थाटून हॉलिडे पॅकेजच्या बहाण्याने अनेकांना गंडा घातल्याचे प्रकार घडलेले आहेत, त्यानंतरही शहरात असे प्रकार सुरूच आहेत.