नवी मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. ३१ मेपूर्वी नालेसफाई व रोडची कामे पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या असून रोडवर नवीन खोदकाम करण्यासाठी परवानग्या बंद केल्या आहेत. शहरातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला महापालिकेसह इतर आस्थापनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आयुक्तांनी पूर्वतयारीच्या कामांचा आढावा घेतला. नाले व गटारांची सफाई ३१ मेपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. साफसफाईच्या कामामध्ये निष्काळजीपणा केला जाऊ नये. २४ तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. महापालिका मुख्यालयामध्ये मुख्य केंद्र सुरू केले जाणार असून ऐरोली, वाशी, नेरूळ अग्निशमन केंद्राच्या ठिकाणी आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू केला जाणार आहे. सर्व विभाग कार्यालयांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महावितरणनेही आवश्यक ती दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, अशा सूचना या बैठकांमध्ये देण्यात आल्या आहेत. शहरातील होल्डिंग पाँड व फ्लॅपगेटची दुरुस्ती, आवश्यकतेप्रमाणे वृक्षछाटणी, पाणीपुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीने मशिन दुरुस्ती, जलकुंभ सफाई, दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणांची पाहणी, धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून नोटीस बजावण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीला अतिरिक्त आयुक्त संजय पत्तीवार, अंकुश चव्हाण, उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर, शहाजी उमप, एमटीएनएलचे एस. व्ही. कुमार, शहर अभियंता मोहन डगावकर, सुरेंद्र पाटील, जी. व्ही. राव, डी. एस. ठाकूर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
नालेसफाई ३१ मेपूर्वी करा
By admin | Published: May 07, 2015 12:30 AM