अधिकृत रिक्षा स्टॅण्ड उपलब्ध करून द्या; काँग्रेसची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 11:51 PM2019-10-31T23:51:07+5:302019-10-31T23:51:18+5:30
रिक्षाचालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा
नवी मुंबई : शहरात रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अधिकृत स्टॅण्ड कमी असल्यामुळे रिक्षा व्यावसायिकांची गैरसोय होत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या ठिकाणी स्टॅण्ड उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रीय मजदूर काँगे्रस महाराष्ट्र (इंटक)ने केली आहे.
कोपरखैरणेमध्ये इंटकने पाठपुरावा करून रिक्षा स्टॅण्ड सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. शहरात रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढलेल्या रिक्षांच्या तुलनेमध्ये स्टॅण्ड तयार करण्यात आलेले नाहीत. यामुळे उपलब्ध स्टॅण्डवर रिक्षांची मोठी रांग लागू लागली आहे. रिक्षाचालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या सोडविण्यासाठी आरटीओ, वाहतूक विभाग व महापालिकेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. शहरात आवश्यक त्या ठिकाणी नवीन स्टॅण्ड निर्माण करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त इतर समस्याही सोडविण्यात याव्यात, अशी मागणी इंटकच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. वेळ पडल्यास रिक्षा व्यावसायिकांच्या हक्कासाठी लढा देणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. या वेळी रवींद्र सावंत यांच्यासह इंटकचे उपाध्यक्ष बाळकृष्ण खोपडे, संघटनेचे पदाधिकारी शंकरराव पडूळकर, अजिंक्य चौगुले, संगीता टाकळकर आदी उपस्थित होते.