पनवेल महापालिका देशात अव्वल बनवून दाखवू - पाटील
By Admin | Published: May 16, 2017 12:52 AM2017-05-16T00:52:01+5:302017-05-16T00:52:01+5:30
पनवेल महापालिकेच्या अनुषंगाने शहरात कोणकोणत्या सोयी-सुविधा मिळायला हव्यात, कोणते राजकीय पक्ष यांची शहरातील समस्या सोडवू शकते
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोजा : पनवेल महापालिकेच्या अनुषंगाने शहरात कोणकोणत्या सोयी-सुविधा मिळायला हव्यात, कोणते राजकीय पक्ष यांची शहरातील समस्या सोडवू शकते, यासाठी सोमवारी पनवेल ज्येष्ठ नागरिक सभागृहात ‘व्हिजन महापालिकेचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या वेळी भाजपावगळता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्षाचे तसेच भीमशक्ती गटाचे नेते उपस्थित होते.
महापालिकेवर महाआघाडीची सत्ता आल्यास शालेय विद्यार्थ्यांना उच्चदर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करू, तसेच सीबीएससी बोर्डाचे १२ वीपर्र्यंतचे शिक्षण उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन यावेळी विवेक पाटील यांनी दिले. पनवेल शहरातील ७० टक्के नागरिकांचा पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. हा पाण्याचा प्रश्न शेकाप आघाडीच्या सत्तेनंतर तत्काळ सोडवणार आहे. शहरात लवकरच ५०० खाटांचे अद्ययावत रु ग्णालय उभारणार असून पनवेल महापालिका देशात अव्वल करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन यावेळी विवेक पाटील यांनी केले.
शेकापचे शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांनी कचरा प्रश्नावर आवाज उठवला. महापालिकेच्या माध्यमातून कचऱ्यापासून खतनिर्मिती कशी केली जाईल, यावर अभ्यास करून यंत्रणा राबवली जाईल. याशिवाय औद्योगिक क्षेत्रात तरु णांना रोजगार मिळवून देण्यासाठी विशेष भर दिला जाणार असल्याचे बाळाराम पाटील यांनी सांगितले. व्हिजन पनवेल महानगर पालिका कार्यक्र मासाठी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आर. सी. घरत, कामगार नेते महेंद्र घरत, सेनेचे प्रथमेश सोमण, भारिपचे जीवन गायकवाड, राष्ट्रवादीचे सदाशिव गायकवाड आदी उपस्थित होते.