‘मलावी’चा आंबा मुंबईत, हिवाळ्यात चाखा चव; प्रतिबॉक्स ३ ते ५ हजार रुपये दर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 06:39 AM2024-11-28T06:39:40+5:302024-11-28T06:40:28+5:30
मुंबई बाजार समितीमध्ये बुधवारी मलावी हापूसचे ९४५ बॉक्स व टॉमी अटकिन्स आंब्याचे २७० बॉक्स विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
नवी मुंबई - सर्वांना उत्सुकता लागून असलेल्या पूर्व अफ्रिकेमधील मलावी देशातील आंबा बुधवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाला. प्रतिबॉक्स ३ ते ५ हजार रुपये दराने आंब्याची विक्री झाली आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा मलावी देशातील आंबा भारतामध्ये विक्रीसाठी येत असतो. ऐन हिवाळ्यात ग्राहकांना आंब्याची चव चाखता येते. मुंबई बाजार समितीमध्ये बुधवारी मलावी हापूसचे ९४५ बॉक्स व टॉमी अटकिन्स आंब्याचे २७० बॉक्स विक्रीसाठी दाखल झाले आहेत. एका बॉक्समध्ये आंब्याच्या आकाराप्रमाणे १०-२० नग आहेत. तीन किलो वजनाच्या या पेटीला ३ हजार ते ५ हजार रुपये दर मिळाला आहे. बाजार समितीमधून मुंबई क्रॉफर्ड मार्केट फळ बाजार, ब्रीचकँडी, घाटकोपर, माटुंगा, जूहू, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, राजकोट व इतर ठिकाणच्या मार्केटमध्ये हा आंबा विक्रीसाठी पाठविला आहे.
कोकणातून १३ वर्षांपूर्वी नेली रोपे
भौगोलिक वातावरणातही साधर्म्य आहे. मलावीमधील शेतकऱ्यांनी २०११ मध्ये कोकणातून हापूसची रोपे नेली होती. तेथे ४०० एकरमध्ये हापूसची बाग तयार केली आहे. प्रत्येक वर्षी नोव्हेंबरमध्ये हा आंबा विक्रीसाठी भारतामध्ये येत असून, त्यासोबत तेथील टॉकी अटकिन्स आंबाही विक्रीसाठी येतो. गतवर्षी जानेवारीपासून कोकणच्या हापूसची नियमित आवक सुरू झाली होती. परंतु, यावर्षी कोकणचा हंगाम लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
प्रत्येक वर्षी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मलावीचा आंबा मार्केटमध्ये येतो. यावर्षी एक आठवडा उशिरा आवक सुरू झाली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ग्राहकांना आंब्याची चव चाखता येणार आहे. - संजय पानसरे, संचालक, मुंबई बाजार समिती