मलावी चा टाॅमी अॅटकिन्स आंबा एपीएमसी मध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 10:07 PM2019-12-21T22:07:51+5:302019-12-21T22:08:15+5:30
एपीएमसी मध्ये हा आंबा 300 रूपये प्रतिकिलो दराने विकला जात असून किरकोळ मार्केट मध्ये जवळपास 400 रूपये किलो दराने उपलब्ध होण्याची शक्यता आहे
नवी मुंबई- दक्षिण पूर्व अफ्रिकेतील मलावी देशातील हापूस नंतर टाॅमी अॅटकिन्स आंबा ही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दाखल झाला आहे. 22 टन आवक झाली असून अजून 44 टन आवक लवकरच होणार आहे. एपीएमसी मध्ये हा आंबा 300 रूपये प्रतिकिलो दराने विकला जात असून किरकोळ मार्केट मध्ये जवळपास 400 रूपये किलो दराने उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
पावसाळा लांबल्यामुळे कोकणातील हापूस आंब्याला उशीरा मोहोर लागत आहे. ग्राहकांना हापूस ची चव चाखण्यासाठी मार्चपर्यंत वाट पहावी लागणार आहे. या कालावधीत विदेशातील आंबा विक्रीसाठी भारतात येऊ लागला आहे. नोव्हेंबर मध्ये मलावी देशातील हापूस आंबा विक्रीसाठी आला होता. शनिवारी तेथील टाॅमी अॅटकिन्स आंबा एपीएमसी मध्ये दाखल झाला आहे. समुद्र मार्गे तीन कंटेनर मधून 66 टन आंबा मागविला असून शनिवारी पहिला कंटेनर मार्केट मध्ये पोहचला. 4 किलो वजनाचे 5500 बाॅक्स आले आहेत. 300 रूपये किलो विक्री होत आहे.
ग्राहकांकडून ही मलावी मधील हापूस आंब्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती फळ व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.